Pune News : हडपसर परिसरातील सराफाची 50 लाखांची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – हडपसरच्या एका सराफीशी जवळीकता वाढवत बंगाल येथील मातीचे सोने होते, असे सांगत त्यांचा विश्वास संपादन करून त्यांची तबल 50 लाख रुपयांना फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 2020 ते 2021 या कालावधीत हा प्रकार घडला आहे.

मुकेश चौधरी, त्याचा काका यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विपुल नंदलाल वर्मा (३९, रा. माँ इमारत, हडपसर गाव) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्मा यांचा हडपसर गाव येथे पवन ज्वेलर्स नावाने दुकान आहे. तर चौधरी हा मूळचा हरियाणा येथील आहे. त्याचा गाई व दुग्ध पदार्थाचा व्यवसाय आहे. चौधरी याची चौधरी याच्याशी अंगठी खरेदीच्या निमित्ताने ओळख झाली होती. यातूनच पुढे त्यांच्यात नंतर घरगुती संबंध निर्माण झाले. यासाठी तिन्ही संशयीत आरोपींनी संगनमत केले. त्यासाठी त्यांनी त्यांना पनीर, तांदूळ धान्य देऊन अधिक विश्वास संपादन केला. तसेच फिर्यादी यांच्या वडिलांशी जवळीक साधून त्यांना आमच्याकडे बंगाल येथून आणलेली माती आहे, माती गरम केल्यानंतर त्याचे सोने होते असे सांगितले.

हातचलाकी करून त्यांनी माती गरम करून सोने काढून दाखवले. चौधरीने घरातील लग्न असल्याचे सांगत यांच्याकडून पैशाची मागणी फिर्यादी यांच्या कुटुंबियांना केली. त्या बदल्यात त्याने 4 किलो बंगाल येथून आणलेली माती त्यांना दिली. तिन्ही आरोपींनी माती दिल्यानंतर फिर्यादीकडून वेगवेगळ्या प्रकारचे सोन्याचे 48 तोळे दागिने आणि 30 लाखाची रोकड घेतली. दरम्यान फिर्यादी यांनी माती गरम करून सोने करण्याचा प्रयत्न केला असता मातीचे सोने झालेच नाही. आपली फसवणूक झाल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. मागील वर्षांपासून हा प्रकार सुरू होता. अधिक तपास उपनिरीक्षक सौरव माने करत आहे.