Pune News : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून व्यावसायीकांची लूट ! पुणे जिल्हा व्यापारी संघर्ष समितीकडून त्या अधिकारी व कर्मचार्‍यांवर कारवाईची मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून (PMC Encroachment Department)  व्यावसायीकांची लुट सुरू आहे. अतिक्रमण कारवाई दरम्यान जप्त केलेल्या मालाचा पंचनामाच केला जात नाही. त्यामुळे दंड भरूनही सर्व माल मिळेल याची खात्री नसते. तर बरेचदा दंड आकारणी करण्याऐवजी ‘चिरीमिरी’ घेउन माल सोडला जात असल्याची तक्रार पुणे जिल्हा व्यापारी संघर्ष समितीने महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

पुणे जिल्हा व्यापारी संघर्ष समितीचे मुफद्दल हुसैन बेकरीवाला यांनी यासंदर्भात निवेदन प्रसिद्धीला दिले आहे. त्यामध्ये अतिक्रमण विभागाच्यावतीने कारवाई दरम्यान व्यावसायीकांचा माल उचलून नेला जातो. हा माल उचलताना पंचनामा केला जात नाही. माल सोडविण्यासाठी ५ हजार रुपये दंड आकारला जातो. परंतू उचलून नेलेल्या मालापैकी अनेक वस्तु प्रामुख्याने किंमती वस्तु गायब असतात. पंचनामा केला जात नसल्याने नेलेल्या मालाची खातरजमा करणेही अवघड होते. यासंदर्भात अतिक्रमण विभागाच्या प्रमुखांकडे दाद मागितल्यानंतरही उत्तरे दिली जात नाही. बरेचदा दंडाची आकारणी करण्याऐवजी चिरिमिरी घेउन माल सोडला जातो.

अतिक्रमण विभागाच्यावतीने सुरू असलेल्या या लुटमारीला चाप लावण्यासाठी कारवाई दरम्यान जप्त केलेल्या मालाचा पंचनामा करण्यात यावा. तसेच अतिक्रमण कारवाईसाठी आलेल्या वाहनांवर अतिक्रमण कारवाईसाठीचे वाहन असा उल्लेख असावा. अतिक्रमण कारवाईची कायदेशीर पद्धत काय आहे याची माहिती सर्व जनतेसाठी वेळोवेळी प्रसिद्ध करावी. तसेच कारवाई दरम्यान जप्त केलेल्या मालाची परस्पर विल्वेवाट लावणारे अधिकारी आणि कर्मचार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी बेकरीवाला यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे.