Pune News : … म्हणून रेकॉर्डवरील गुन्हेगारानं रिक्षा चालकाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मार्केटयार्ड(Market Yard ) परिसरात रिक्षा नंबरला असताना तो एकाने मध्येच घुसवून भाडे नेल्यावरून झालेल्या वादात रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी चालकाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडल्याची घटना घडली. यात रिक्षा चालक गंभीर जखमी झाला आहे.

याप्रकरणी स्वप्नील भालेकर (वय 27) यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अजय उर्फ अक्षय बाबासाहेब हंकारे (वय 22), अतिक उर्फ गिल्य्या रज्जक शेख (वय 19) व शाहरुख सलीम शेख (वय 19) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रिक्षा चालक आहेत. तर आरोपी अजय उर्फ अक्षय याचे वडील देखील रिक्षा चालक आहेत. ते मार्केटयार्ड येथील गेट क्रमांक 4 समोर रिक्षा स्टॅण्डला लावतात. नंबरनुसार येथे भाडे नेले जाते. दरम्यान काल दुपारी फिर्यादी यांचा भाडे घेऊन जाण्याचा नंबर होता. मात्र अजय उर्फ अक्षय याचे वडीलमध्येच रिक्षा घेऊन आले. त्यांनी फिर्यादी यांचा नंबर असताना भाडे घेतले. यावरून त्यांच्यात वादावादी सुरू झाली. यावेळी आरोपी हे तेथे आले. त्यांनी माझे वडिलांना बीपी व शुगरचा त्रास आहे. त्यांना भाडे घेऊन जाऊदे असे सांगितले. यावेळी फिर्यादीनी देखील त्यांना भाडे घेऊन जाण्यास परवानगी दिली.

यानंतर मात्र काही वेळाने तिघे त्याठिकाणी आले. तसेच त्यांनी फिर्यादी यांच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. फिर्यादी यांनी समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपींनी त्यांच्या डोक्यात बिअरची बाटली घातली. तर फुटलेल्या बाटलीने गालावर वार केले. यात ते गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आरोपी अजय उर्फ अक्षय आणि अतिक उर्फ गिल्या हे दोघे रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे सांगण्यात आले आहे. अधिक तपास मार्केटयार्ड पोलीस करत आहेत.