Pune News : पिस्तूल अन् शस्त्र बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला दत्तवाडी पोलिसांनी केली अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दहशत माजवण्यासाठी पिस्तूल अन् शस्त्र बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला दत्तवाडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून पिस्तूल, 2 जिवंत काडतुसे असा ऐवज जप्त केला आहे.

सिद्धार्थ विजय गायकवाड ऊर्फ चॉकलेट (वय 19, रा. सहकारनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात वाढलेल्या हाणामाऱ्या अन् टोळक्यांचे राडे तर दुसरीकडे घरफोड्या व वाहन चोरीच्या घटनांमुळे शहर गुन्हेगारीने ढवळून निघाले आहे. यामुळे स्थानिक पोलीस हद्दीत गस्त घालून सराईत गुन्हेगारांवर लक्ष ठेवत आहेत. यादरम्यान दत्तवाडी पोलिसांचे तपास पथकातील कर्मचारी पोलीस हवालदार कुंदन शिंदे व अमित सुर्वे यांना बतमीदारामार्फत माहिती मिळाली की, तावरे कॉलनीत एकजण उभा असून, त्याच्याजवळ घातक शस्त्र आहेत. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक राम राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक स्वप्नील लोहार, कुंदन शिंदे, अक्षयकुमार वाबळे, सागर सुतकर, नवनाथ भोसले, राहुल ओलेकर यांच्या पथकाने सापळा रचून त्याला पकडले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याजवळ देशी बनावटीचे पिस्तूल, लोखंडी पालघन, दोन जिवंत काडतुसे असा साठा मिळाला. तसेच त्याच्याकडे चौकशी सुरू असून, त्याने हे पिस्तूल कोणाकडून आणले आणि कशासाठी याचा तपास सुरू आहे. सिद्धार्थ हा सराईत गुन्हेगार असून, दत्तवाडी व सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.