Pune News : कुख्यात गुंड गजानन मारणे आणि गँग ‘गोत्यात’ ? पोलिसांनी घेतलं ताब्यात; काही जणांची धरपकड सुरू, अटकेची टांगती तलवार !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कुख्यात गुंड गजानन मारणेची दोन खून खटल्यातून मुक्तता झाल्यानंतर त्याच्यावर आणखी खटले नसल्याने सोमवारी (दि.15) सायंकाळी मारणे याची तळोजा कारागृहातून सुटका करण्यात आली. कारागृहातून बाहेर येताच कुख्यात गुंड गजानन मारणेच्या टोळीतील ‘वाढीव’ कार्यकर्त्यांनी बेकायदा जमाव जमवून फटाके वाजवले. तसेच आरडाओरडा करुन दशहत निर्माण केली. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुणे पोलिसांनी कुख्यात गुंड गजानन मारणे आणि त्याच्या ‘विश्वासू’ 17 ते 18 जणांना ताब्यात घेतले आहे. मारणेचे जंगी स्वागत करत रॅलीत सहभागी झालेल्यांची धरपकड सुरु करण्यात आली आहे.

खून खटल्यात मुक्तता मिळाल्यानंतर गजानन मारणे याची तळोजा कारागृहातून सुटका करण्यात आली. त्याचे स्वागत करण्यासाठी कारागृहाबहेर त्याचे शेकडो समर्थक उपस्थित होते. त्यांनी महाराष्ट्राचा ‘किंग’ असे स्टेटस टाकत त्याची एक्सप्रेस हायवेवरुन जंगी मिरवणूक काढली. यामध्ये 300 हून अधिक चारचाकी गाड्या सहभागी झाल्या होत्या. उर्से टोलनाका येथे जोरदार घोषणाबाजी करत फटाके वाजवले.

तसेच आरडाओरडा करुन त्याचे ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने चित्रिकरण करुन दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी ड्रोन कॅमेरा ताब्यात घेतला असून गुन्हा दाखल केला आहे. गजानन मारणे याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुंबई पुणे महामार्गावर दहशत पसरवणाऱ्यांची धरपकड सुरु केली आहे. पोलिसांनी व्हिडीओ मध्ये दिसणाऱ्यांचा शोध घेण्यास सुरु केला आहे. तसेच व्हिडीओत दिसणाऱ्या गाड्यांच्या क्रमांकावरुन रॅलीत सहभागी झालेल्याचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.