Pune News : खुशखबर ! ‘या’ दिवशीपासून सिंहगड किल्ल्याचे दरवाजे पर्यटकांसाठी खुले

पुणेः  पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या नऊ महिन्यांपासून बंद असलेली सिंहगडाची दारे पर्यटकांसाठी मंगळवार (दि. 8) पासून खुली होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली आहे. सिंहगड पर्यटकांसाठी खुला व्हावा, या मागणीसाठी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी जिल्हाधिका-यांची भेट घेऊन याबाबत त्यांना निवेदन दिले होते. त्यानंतर जिल्हाधिका-यांनी जिल्हा वनअधिकारी व पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून सिंहगड सुरु करण्याबाबत तात्काळ निर्णय घेतला आहे.

गेल्या नऊ महिन्यांपासून सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद आहे. काही दिवसांपूर्वी नियम शिथील करीत ट्रेकिंगसाठी परवानगी दिली होती. परंतू पर्यटकांना अद्याप परवानगी दिली नव्हती. त्यामुळे पर्यटकांना गडावर घेऊन जाण्यासाठी वाहतुकीचा व्यवसाय करणारे, बेसन- भाकर, चहा- भजी, दही-ताक, रानमेवा विकून आपला उदरनिर्वाह चालवणा-या छोट्या- मोठ्या विक्रेत्यावर उपासमारीची वेळ आली होती.  मात्र आता उद्यापासून सिंहगड पर्यटकांसाठी खुला होणार असल्याने व्यावसायिकांच्या उपजिविकेचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

पर्यटकांसाठी बंद असलेली खडकवासला धरण चौपाटी चाकणकर यांनी पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना भेटून तोंडी आदेशाने सुरु करून घेतली. त्याच धर्तीवर सिंहगडावरील व्यवसाय सुरु व्हावेत, अशी मागणी सिंहगडावरील रहिवाशांना चाकणकर यांच्याकडे केली होती. त्यानुसार चाकणकर यांनी जिल्हाधिका-यांची भेट घेऊन सिंहगड खुला करण्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी देशमुख यांना दिले होते.

सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी व व्यावसायिकांसाठी सुरु व्हावा, यासाठी जिल्हा वनअधिकारी व पुरात्व विभागाच्या अधिका-याशी चर्चा केली आहे. उद्यापासून सिंहगड पर्यटकांसाठी खुला होईल, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले.

सिंहगड पर्यटकांसाठी खुला होत आहे. त्यामुळे परिसरात येणा-या पर्यटकांचे, गडप्रेमींचे प्रमाण वाढेल. येणाऱ्या प्रत्येकाने शासनाने ठरवूून दिलेल्या नियमांचे पालन करावे. वनसंपत्तीचे नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा मुख्य वन अधिकारी राहुल पाटील यांनी केले आहे.