Pune News : गुन्हा दाखल होण्यापूर्वीच पती, 3 नणंदासह 8 जणांना अटकपूर्व जामीन, विवाहितेचा छळ प्रकरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –    आमच्यासाठी तू अशुभ असल्याचे म्हणत विवाहितेचा हुंड्यासाठी छळ केल्या प्रकरणात पती, तीन नणंदसह आठ जणांना अटकपूर्व जामीन न्यायालयाने मंजूर केला आहे. या प्रकरणात अर्जदारांवर गुन्हा दाखल होण्यापूर्वीच अटकपूर्व जामीनासाठी अर्ज करण्यात आला होता.
फिर्यादीने यापूर्वी केलेल्या लग्नाची माहिती लपविली होती. तिने केलेल्या फसवणुकीबाबत अर्जदार यांनी यापूर्वीच अर्ज केलेला होता, असा युक्तिवाद बचाव पक्षातर्फे ॲड. श्रीकृष्ण घुगे यांनी केला. दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत दर बुधवारी सकाळी अकरा ते दुपारी अडीच या वेळेत आणि तपास अधिकारी बोलावतील, त्यावेळी पोलिस ठाण्यात यायचे या अटीवर सत्र न्यायाधीश आर. यु. मालवणकर यांनी हा आदेश दिला.

याबाबत कुहेली माधव सोनकांबळे (वय २७, रा. हडपसर) यांनी हडपसर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती माधव शिवलिंग सोनकांबळे, नणंद वंदना नारायण कांबळे, रंजना शिवलिंग सोनकांबळे, यशोदा अमोल शृंगारे, भगवान शिवलिंग सोनकांबळे, नारायण लिंबराज कांबळे, शिवलिंग मरीबा कांबळे आणि अनिष्वा शिवलिंग कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. १४ फेब्रुवारी ते सात डिसेंबर २०२० या कालावधीमध्ये हडपसर आणि गोजेगाव मुखेड, जि. नांदेड येथे ही घटना घडली.

चांगला स्वयंपाक येत नाही यासह विविध कारणांनी फिर्यादीचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.