Pune News : असूद्या न्यायालयाचा आदेश, मी आजीकडेच थांबणार; 12 वर्षीय अक्षयचा निश्चय पोलिसांना पेचात पाडणारा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   आई आजारी असल्याने १२ वर्षीय अक्षय त्याच्या आजीकडे राहायला गेला. त्यानंतर लॉकडाऊन झाल्याने तो तिकडेच रमला. तो पुन्हा घरी येण्यास तयार नाही म्हणून त्याचा ताबा मिळण्यासाठी आई-वडील न्यायालयात गेले. त्यावर उच्च न्यायालयाने अक्षयचा ताबा आई-वडिलांना दिला. पण असूद्या न्यायालयाचा आदेश, मी आजीकडेच थांबणार असा निश्चय त्याने केला आहे.

अक्षयत्याच्या आजीकडे (आईची आई) नाशिकला राहायला गेला होता. तर त्याची आई पुनम आणि वडील मिलिंद (सर्व नावे बदललेली) हे पुण्यातच असतात. वडील एका आयटी कंपनीत कामाला आहेत तर आई गृहिणी आहे. लॉकडाऊन काळात अक्षयला आजीकडेच रहायला आवडू लागले. त्यामुळे वडील त्याला घेऊन जाण्यासाठी आले असता त्याने पुन्हा पुण्यात येण्यास नकार दिला. मुलगा आपल्याकडे येण्यास व त्याचा ताबा देण्यास आजी तयार नसल्याने शेवटी मिलिंद हे न्यायालयात गेले. मुलाचा ताबा मिळावा म्हणून त्यांनी अर्ज केला. मात्र आई-वडील मुलाला त्रास देतात. त्याचा व्यवस्थित सांभाळ करीत नाहीत, असे आजीने तेथे शाबीत केले. त्यामुळे अक्षयचा ताबा त्याच्या आजीकडेच राहू द्यावा, असा आदेश न्यायालयाने दिला. या आदेशाचा विरोधात मुलाचे आई-वडील जिल्हा बाल न्यायालयात गेले. त्या न्यायालयात असे दावे चालविण्याचा अधिकार नसल्याने आई-वडिलांनी ॲड. सूचित मुंदडा आणि ॲड. राजेश मोरे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात अपील केले. अक्षयचा ताबा त्वरित आई-वडिलांना द्यावा. आजीने प्रत्येक शनिवारी व रविवारी दुपारी दोन ते पाच यावेळेत अक्षयला भेटावे, असा आदेश त्यात उच्च न्यायालयाने दिला आहे.

पोलिसही झाले हतबल :

निकालाच्या आदेशासाठी आजी, अक्षय आणि त्याचा आई-वडिलांना उच्च न्यायालयाने न्यायालयात बोलावले होते. त्यावेळी अक्षयने मला आई-वडिलांकडे जायचे नाही. आजीबरोबरच थांबायचे आहे, असे न्यायालयास सांगितले. त्यामुळे पोलिसही त्याच्यापुढे हतबल झाले. न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी कशी करायची असा प्रश्‍न त्यांना पडला आहे.