Pune News : तीक्ष्ण हत्याराने वार करून खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह कॅनॉलमध्ये टाकला, हडपसरमधील घटना

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह कॅनॉलमध्ये टाकून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. हडपसर परिसरात ही घटना घडली आहे.

राहुल श्रीकृष्ण नेने (वय 45) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा भाऊ सिद्धार्थ नेने (वय 39) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल नेने यांना दारूचे व्यसन होते. ते गेल्या 6 ते 7 वर्षांपासून घरातून बाहेर राहत होते. दरम्यान काल सकाळी शिंदेवाडी येथील कॅनॉलमध्ये एक मृतदेह तरंगत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्यावर जखमा असल्याचे दिसून आले. मृतदेह ससून रुग्णालयात पाठवला. त्याचे पोस्ट मार्टम करण्यात आले. त्यावेळी चेहऱ्यावर आणि डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार केल्याचे समोर आले. त्यानुसार खून केल्यानंतर मृतदेह टाकण्यात आल्याचे समोर आले आहे. दरम्यान खुन कोणी आणि का केले हे अद्याप समोर आलेले नाही. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गायकवाड हे करत आहेत.