Lockdown : बायकोशी भांडाल तर व्हावं लागेल ‘क्वारंटाईन’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लॉकडाऊनच्या काळात नवरा-बायकोमध्ये भांडण झाल्यास सुरुवातीला समुपदेशन करण्यात येईल. तरीही भांडण थांबलं नाही तर नवऱ्याला क्वारंटाईन केलं जाईल, असा इशारा पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिला आहे.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे बहुतेक पुरुष मंडळी आपल्या घरात बसून आहेत. परिणामी लॉकडाऊनच्या काळात ग्रामीण भागात कौटुंबिक हिसांचाराच्या प्रमाणांमध्ये वाढ झाल्याची अनेक प्रकरणं समोर आली आहेत.

यावर तोडगा म्हणून पुणे जिल्हा परिषदेकडून प्रत्येक गावात ग्रामस्तरीय दक्षता समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत ग्रामपंचायतीमधील महिला लोकप्रतिनिधी, अंगणवाडी सेविका, महिला बचत गटातील महिलांचा समावेश आहे. नवरा बायकोची भांडण झाल्यास या समितीमधील सदस्यांकडून आधी दोघांचं समुपदेशन केलं जाईल. मात्र त्यानंतरही नवरा बायकोमधील भांडणं न थांबल्यास नवऱ्याला इन्स्टिट्यूशनल क्वॉरन्टाईन करण्यात येईल, असे पुणे जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद यांनी सांगितले.