Pune News : महापालिका खाजगी कंपन्यांकडून स्वस्तात वीज घेणार, दररोज 12 लाख रुपयांची होणार बचत !

पुणे- पुणे महापालिकेने वीज खर्चात बचत करण्याच्या दृष्टीने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. जलशुद्धीकरण केंद्रासाठी सर्वाधिक विजेचा वापर होत असून राज्य शासनाच्या एमईआरसी कंपनीचा दरही अधिक असल्याने खासगी उत्पादक कंपन्यांकडून वीज खरेदीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

महापालिकेकडून अगदी स्ट्रीट लाईट , मनपा कार्यलय , शाळांच्या इमारतीपासून जल आणि मैला पाणी शुद्धीकरण केंद्रासाठी वीज वापरली जाते. पालिकेने महापालिकेच्या काही इमारतींवर सोलर पॅनल बसविले आहेत. तसेच अनेक ठिकाणी एलईडी फिटिंग्जचा वापर करण्यात येऊ लागला आहे. आता यापुढे जाऊन शासकीय वीज मंडळाच्या महागड्या ठरणार्‍या विजेला पर्याय शोधण्यात येत आहे. विशेष असे की शासनाच्या वीज कंपणीपेक्षा खासगी कंपनीची वीज स्वस्त आहे.

यासाठी पालिकेने खासगी कंपनीच्या धोरणानुसार दररोज एक मेगावॉट पेक्षा अधिक वापर असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रांसाठी खासगी कंपनीकडून वीज घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. एक मेगावॉट पेक्षा अधिक वापर असलेल्या ११ केंद्रांसाठी दररोज ६ लाख युनिट वीज लागते. एमआरसीचा सध्याचा युनिटचा दर हा साधारण साडेआठ रुपये आहे. तर खासगी कंपनीचा दर साधारण ६ ते साडेसहा रुपयांच्या आसपास आहे. रोजचा वापर पाहिल्यास खासगी कंपन्यांची वीज खरेदी केल्यास दररोज १२ लाख रुपयांची बचत होणार आहे. सध्या टाटा पॉवर्स, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी पॉवर, टोरांट, रिलायन्स, एसजेव्हिएन ली. या खासगी कंपन्या वीज पुरवठा करतात. महापालिका जाहिरात प्रसिद्ध करून एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट मागविणार असल्याची माहिती, एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.