Pune News : पुणे लोहमार्ग पोलिसांची मोठी कारवाई, थर्टी फस्टच्या पार्श्वभुमीवर 1 कोटी रूपयांचे 34 किलो चरस जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – थर्टी फस्टच्या आयोजित पार्ट्यांना अमली पदार्थ पुरवण्यासाठी हिमाचल प्रदेशमधून आलेल्या दोन तस्करांना पुणे लोहमार्ग पोलिसांनी विशेष मोहिमे राबवत पकडले आहे. त्यांच्याकडून तब्बल 34 किलो 400 ग्रॅम चरस पोलिसांनी जप्त केले असून, त्याची किंमत 1 कोटी 3 लाख 64 हजार इतकी आहे. दरम्यान हिमाचल प्रदेश येथील एका अधिकाऱ्याने पुणे लोहमार्ग पोलीस अधीक्षक सदानंद वायसे-पाटील यांना ही गोपनीय माहिती दिली होती. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आण्यात यश आले आहे.

ललित कुमार दयानंद शर्मा (वय 49) कैलाससिंग रुपसिंग सिंग (वय 40, दोघेही हिमाचल प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बॅगेत 34 किलो 400 ग्रॅम चरस सापडले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची किंमत 1 कोटी 3 लाख रुपये इतकी आहे.

दरवर्षी प्रमाणे थर्टी फस्टला यंदा देखील पार्ट्या आयोजित केल्या जात असल्याचे या कारवाईवरून दिसत आहे. दरम्यान लोहमार्ग पोलीस अधीक्षक सदानंद वायसे पाटील यांचे एक बॅचमेट अधिकारी सध्या हिमाचल प्रदेश येथे नोकरीस आहेत. त्यांनी सदानंद वायसे पाटील यांना पुणे शहरात अमली पदार्थांची तस्करी होणार असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर लोहमार्ग पोलिसांची चार पथके सतत सात दिवस दिल्ली वरून येणाऱ्या प्रत्येक रेल्वेवर करडी नजर ठेवून होते. दरम्यान 19 डिसेंबर रोजी पुणे रेल्वे स्थानक परिसरातील वाडिया ब्रिजखाली दोन व्यक्ती अंमली पदार्थ घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी तीन वेगवेगळ्या पथकाच्या मदतीने त्याठिकाणी सापळा रचला होता. यादरम्यान रात्री पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास त्याठिकाणी आलेल्या दोन व्यक्तीना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली. त्या बॅगेत हे चरस सापडले आहे. त्यामुळे पुण्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

पुण्यासाठी दोन किलो चरस…
पोलिसांनी 34 किलो चरस जप्त केल्यानंतर त्यांच्याकडे चौकशी केली. त्यात 22 किलो चरस मुंबईत, 5 किलो चरस गोव्यात तर बंगलोर येथे 5 आणि 2 किलो 400 ग्रॅम पुणे शहरात वाटप करण्यात येणार असल्याचे सांगितले. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पुणे शहराच्या आसपास असणाऱ्या हॉटेलमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या पार्ट्यांमध्ये या चरसचा वापर होणार होता. आता या पार्ट्या नेमक्या कोठे होणार होत्या आणि ते चरस कोणे मागवले याची चौकशी पोलीस करत आहेत.