Pune News : तोतया पोलिसाला लोहमार्ग पोलिसांकडून बेड्या; पोलिस असल्याचे सांगून प्रवाशांना खेचायचा जाळ्यात

पुणेः पोलिसनामा ऑनलाईन – पोलिस असल्याची बतावणी करत प्रवाशांना लुटणार्‍याला तोतयाला लोहमार्ग पोलिसांच्या तपास पथकाने सापळा रचून बेड्या ठोकल्या. अविनाश भारत भुर्लेकर (वय.२४ ,रा.सिंदखेरा, ता. हुमनाबाद, जि. बिदर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. यावेळी त्याच्याकडे महाराष्ट्र पोलिसांचा गणवेश व चोरीचा मोबाईल आढळून आला आहे. भुर्लेकर हा पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याने अशाच प्रकारे सिकंदराबाद, हैद्राबाद, दादर,सी.एस.टी या ठिकाणी पोलिस असल्याची बतावणी करत गुन्हे केल्याचे कबुल केले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक मौला सय्यद यांनी पोलिसनामा ऑनलाईनला दिलेल्या माहितीनुसार, संतोष पासवान (वय.१८, रा. बिहार) हे ६ डिसेंबर रोजी सव्वा दोनच्या सुमारास त्यांच्या गावी जाण्यासाठी रेल्वे तिकीटाची चौकशी करत होते. दरम्यान एका अनोळखी व्यक्तीने तो पोलिस असल्याची बतावणी करत त्यांच्याकडे पैशाची विचारणा केली. त्यानंतर ही रक्कम तिकीट बुक करण्याच्या फॉर्मवर नोंदणी करावी लागेल असे सांगत पासवान यांच्याकडील 11 हजाराची रोकड घेतली. पुढे पासवान यांना आधार कार्डची झेरॉक्स घेऊन येण्याच्या बहाण्याने बाजुला लावत आरोपीने पळ काढला होता. याबबात लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान दाखल गुन्ह्यांच्या अनुषंगाने तपास करत असताना पोलिसांना माहिती मिळाली होती की, पोलिस असल्याची बतावणी करत नागरिकांना लुटणारा एक व्यक्ती स्टेशन परिसरात येणार आहे. त्यानुसार पोलिस अधीक्षक सदानंद वायसे -पाटील, अपर अधीक्षक कवीता नेरकर-पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक मौला सय्यद , सुरेशसिंग गौड यांनी बुकिंग ऑफिस व प्लॅटफॉर्म येथे सापळा लावून संशयित तरुणाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली.

ही कामगिरी सहायक पोलिस निरीक्षक बाळासाहेब अंतरकर, हवालदार सुनिल कदम, अनिल टेके,अनिल दांगड,स्वप्निल कुंजीर, बेबी थोरात, केंद्रे,आळंदे, कुंजीर यांच्या पथकाने केली.

आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून,त्याने पोलिस असल्याची बतावणी करत विविध ठिकाणी गुन्हे केल्याचा अंदाज आहे. नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अशाप्रकारे कोणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी लोहमार्ग पोलिसांशी संपर्क करावा.

सुरेशसिंग गौड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक लोहमार्ग पुणे