Pune News : रास्ता पेठेतील ‘रेस्क्यू’ बगाडे यांनी केली घारीला दिले जीवदान

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहर आणि परिसरामध्ये पतंगाच्या मांज्याने घार, कावळा, घुबड आदी पक्ष्यांचे वारंवार गळे घोटले जात आहेत. मात्र, हौशी कलाकारांवर त्याचा काही परिणाम होत नाही, ही खेदजनक घटना आहे. गुरुवार पेठेमध्ये चार-पाच दिवसांपूर्वी पिंपळाच्या झाडावर मांज्यामध्ये घार अडकली होती. त्या घारीला वाचविण्यात यश आल्याचे सर्पमित्र आणि पक्ष्यीमित्र अक्षय बगाडे (रास्ता पेठ) यांनी सांगितले.

मागिल चार दिवसांपासून घार अडकली आहे. अग्निशमक दलालाही त्या घारीला सोडविण्यात यश आले नाही. म्हणून मला तेथील नागरिकांनी माहिती दिली. त्यानंतर मी तातडीने घटनास्थळी पोहोचलो, त्यावेळी घार पिंपळाच्या झाडावर अडकलेली दिसली. लगेच अग्निशमन दल आणि विद्युत विभागाचे वाहन मागविले, त्याच्या ट्रॉलीमध्ये बसून घारीपासून पोहोचण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीसुद्धा घार 50 फूट उंचीवर होती. हूकस्टीकच्या माध्यामतून घारीची सुटका केली. या कामासाठी अग्निशमन दलाचे केतन नरके आणि रोहित जाधव यांच्या आणखी दोन कर्मचाऱ्यांकडून मोलाची मदत मिळाली. बगाडे मागिल 16 वर्षांपासून पक्षी आणि सापांना वाचविण्याचे काम करीत आहेत. आतापर्यंत हजारो साप आणि पक्ष्यांना जीवदान देण्यात यश मिळाल्याचे समाधान वाटत आहे.

बगाडे म्हणाले की, दुचाकीस्वार, सायकलचालक, पादचारी, पक्षी, प्राण्यांचे गळे घोटणाऱ्या पतंग शौकिनांनी आता तरी सावध होऊन पतंग उडविण्याचा जीवघेणा प्रकार थांबविला पाहिजे. दरवर्षी प्रशासन चिनी मांजा विक्रीवर बंद घालत आहे. तरीसुद्धा चोरट्या मार्गाने चिनी मांजाची विक्री केली जात आहे. प्रशासनाने बंदी घालण्याऐवजी स्वतःहून काही बंधने घालून घेतली, तर जीवघेणे प्रकार टाळणे सहज शक्य आहे. प्राणी, पक्ष्यांबरोबर मानवाची जीवित हानी टाळण्यासाठी आता मी पतंग उडवणार नाही, अशी शपथ प्रत्येकाने घ्यायला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.