Pune News : धनकवडी येथील आदर्श नागरी पतसंस्थेत 47 कोटींचा घोटाळा, 63 जणांवर फसवणुकीचा FIR, सचिवांसह 8 पदाधिकार्‍यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील धनकवडी येथील आदर्श नागरी पतसंस्थेच्या व्यवस्थापक, रोखपाल, क्लार्क यांच्या मदतीने संचालकांनी 47 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचे उघडकीस आले असून संचालक मंडळांवर सहकार नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आठ संचालकांनी न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळवा यासाठी अर्ज केला होता. सरकारी वकिलांची बाजू ऐकून घेऊन विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस.एस. गोसावी यांनी अटकपूर्व जामीन फेटाळून लावला. सरकारी वकिल अ‍ॅड. राजेश कवेडिया यांनी सरकारी बाजू मांडली.

कृष्णराव खंडोजी बांदल (संचालक, सचिव), मधुकर ज्ञानोबा बांदल (संचालक), मोहन लक्ष्मण शिंदे (संचालक, नायब तहसिलदार), कुसुम चंद्रकांत देशमुख (संचालीका), काशिनाथ केरबा बनसोडे (व्यवस्थापक), गौतम नाना जोगदंड (कॅशिअर), शंकर सटवा जोगदंड (क्लार्क कम अकाउंटंट), स्वाती सुनिल उमराणी (लेखा परिक्षक) यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला आहे. याप्रकरणी विशेष लेखा परिक्षक वर्ग -1 विलास राजाराम काटकर यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी संचालक तसेच पतसंस्थेतील कर्मचारी यांच्यासह 63 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

बालाजीनगर धनकवडी येथील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत 26 डिसेंबर 1991 ते 20 जानेवारी 2018 या कालावधीमध्ये संचालक आणि पतसंस्थेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी 47 कोटी 9 लाख 81 हजार 758 रुपयांचा घोटाळा केल्याचे लेखा परिक्षणात उघडकीस आले. आरोपींनी कर्ज खात्यांमध्ये स्वत:च्या अधिकाराचा गैरवापर करत मोठा आर्थिक अपहार केला. पतसंस्थेतील ठेवीदारांनी पैशांची मागणी केल्यानंतर त्यांना पतसंस्थेत पैसे नसल्याचे सांगत पैसे देण्यास टाळाटाळ केली. अनेक वेळा पैशांची मागणी करुन देखील पैसे मिळत नसल्याने ठेवीदारांनी पतसंस्थेच्या संचालकाविरोधात तक्रार केली. आतापर्यंत 161 ठेवीदारांनी तक्रारी केल्या आहे.

सरकारी वकिल अ‍ॅड. राजेश कवेडिया यांनी सांगितले की, आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालकांनी आणि पतसंस्थेत काम करणाऱ्या व्यवस्थापक, कॅशियर, क्लार्क यांनी संगनमत करुन कोट्यावधीचा घोटाळा करुन अनेक ठेवीदारांची फसवणूक केली आहे. पतसंस्थेचे ऑडीट केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. संचालकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संचालकांनी न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला. मात्र, न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. गुरुवारी (दि.24) न्यायालयात यावर सुनावणी झाली त्यावेळी न्यायाधीश एस.एस. गोसावी यांनी त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.