Pune News : ट्रेडमार्क व पासिंग ऑफ नियमांचे ‘सिरम’कडून उल्लंघन नाही, SII चे म्हणणे न्यायालयात दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  लशीच्या ट्रेडमार्कबाबत “सिरम इन्स्टिट्यूट आफॅ इंडिया’ (सिरम) ने जून 2020 मध्येच अर्ज केला होता. त्यानंतर सहा महिन्यानंतर “क्‍युटीस बायोटीक’ने लशीच्या संदर्भात अर्ज केला आहे. त्यामुळे “सिरम’ने ट्रेडमार्क व पासिंग ऑफ नियमांचे उल्लंघन केले नाही. तसेच एकाच प्रकरणात नांदेड आणि पुण्यात असा दोन ठिकाणी दावा दाखल करता येणार नाही, असे म्हणणे “कोव्हिशिल्ड’ नावाच्या वापराबाबतच्या वादावर मंगळवारी “सिरम’चे वकील ऍड. एस. के. जैन यांनी मांडले.

“सिरम’ बनवत असलेल्या लशीच्या नावावर नांदेड येथील “क्‍युटीस बायोटीक’ या कंपनीने हरकत घेतली आहे. “कोव्हिशिल्ड’ या ट्रेडमार्कचा वापर करण्यास आम्ही “सिरम’च्या आधी सुरवात केली आहे. त्यामुळे “सिरम’ने लसीची नाव बदलावे, अशी मागणी करणारा दावा कंपनीने येथील जिल्हा न्यायालयात केला आहे. “क्‍युटीस बायोटीक’ने एप्रिल 2020 मध्ये ट्रेडमार्कबाबत केलेला अर्ज हा सॅनिटायझर आणि इतर उत्पादनांबाबत होता. त्यांनी लशीच्या नावाबाबत डिसेंबर 2020 मध्ये अर्ज केला आहे. पण “सिरम’ने जून 2020 मध्येच अर्ज केला होता. त्या बाबतची प्रक्रिया मार्च 2020 मध्ये सुरू केली होती. “क्‍युटीस बायोटीक’ ने नांदेडमध्ये ड्रेटमार्कबाबतचा तर पुण्यात व्यावसायिक दावा दाखल केला आहे. कायदेशीरदृष्ट्या एकाच प्रकरणात दोन ठिकाणी दावा करता येत नाही. नांदेडमध्ये दाखल केलेल्या दाव्याचे कोणतेही कागदपत्रे त्यांनी सादर केले नाहीत. ती आम्ही न्यायालयास दिली आहेत, असा युक्तिवाद ऍड. जैन यांनी केला.

सॅनिटायझर आणि लस विकणे यात फरक

पासिंग ऑफची केस होऊ शकत नाही. कारण सॅनिटायझर आणि लस विकणे यात फरक आहे. त्यामुळे त्यांचे म्हणणे योग्य नाही, असेही ऍड. जैन यांनी म्हणणे मांडले. “क्‍युटीस बायोटीक’ चे वकील आदित्य सोनी यांनी काही निकालांचा संदर्भ देत आपली बाजू मांडली. त्यावर “सिरम’ 22 जानेवारीला युक्तिवाद करणार आहे.