Pune News : शिवम उर्फ शुभम उदयकांत आंदेकर याच्यासह 5 जणांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पाषाण भागात कार आडविल्याच्या रागातून पोलिसांशी वाद घालत त्यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्यावरून आंदेकर टोळीतील पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

शिवम उर्फ शुभम उदयकांत आंदेकर (वय २५, रा. नाना पेठ), साईराज सुनिल काकडे (वय २३, रा. मंगळवार पेठ), राहूल सुरेश खेत्रे (वय ४०, रा. नाना पेठ), समीर विनोद तांबे (वय ३१, रा. नरपतगिरी चौक), शार्दुल प्रमोद ढाके (वय २८, रा. बावधन) याना अटक केली आहे.

शिवम आणि राहूल यांना तडीपार केले होते. तडीपारी संपवून ते आले होते. दरम्यान पाषाण येथील लमाणतांडा वस्तीत त्यांनी पुन्हा गुन्हा केला आहे. चतुःश्रुंगी पोलिस गुरूवारी रात्री गस्त घालत होते. यावेळी त्यांना पाषाण परिसरात गस्त घालताना पोलिसांना एक संशयास्पद कार फिरताना दिसली. त्यामुळे सहायक निरीक्षक विशाल पवार यांच्या पथकाने अडविले. पोलिसांनी कार अडविल्याच्या रागातून त्यांनी पोलिसांशी वाद घातला. तसेच शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. त्यावेळी आरोपींनी मद्यपान केले होते. याप्रकरणी पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास चतुःश्रुगी पोलीस करत आहेत.