Pune News : अमेरिका, कॅनडा आणि अफगाणिस्तानमध्ये उत्पादित होणारा ‘ओजी-कुश’ गांजा विक्रीसाठी आलेल्या तरूणाला सिंहगड पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील गांजा पिणाऱ्यांची देखील पोहच वाढली असून, चक्क अमेरीका, कॅनडा व अफगाणिस्तान या देशांत उत्पादीत होणारा “ओजी-कुश’ गांजा विक्री करण्यास आलेल्या तरुणाला सिंहगड पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. पोलिसांनी ओजी-कुश गांजा व भारतात उत्पादीत होणारा गांजा असा एकूण साडे तीन लाख रुपये किंमतीचा गांजा जप्त केला आहे.

अक्षय प्रकाश शेलार (वय 35, रा. बावधन) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ निरीक्षक देविदास घेवारे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक गुरुवारी रात्री सिंहगड पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना वडगाव बुद्रुक येथील गंगा भाग्योदय सोसायटीजवळील दि स्मोक शॉप या दुकानासमोरील सार्वजनिक रस्त्यावर एक तरुण अंमली पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने थांबला असल्याची खबर मिळाली.

त्यानुसार, पथकाने याठिकाणी सापळा रचून पाठीवरती काळ्या रंगाची सॅक अडकवलेला तरुणाला पकडले. त्याची चौकशी करत अंगझडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडील सॅकमध्ये 72 ग्रॅम वजनाचा ओजी- कुश या गांजा व भारतात तयार होणारा 1 किलो 100 ग्रॅम वजनाचा गांजा असा साडे तीन लाख रुपयांचा गांजा जप्त केला. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असते त्यास 6 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील उपनिरीक्षक कुलदीप संकपाळ व त्यांच्या पथकाने केली आहे.

उच्चभ्रू लोकात फेमस ओजी कुश गांजा
ओजी कुश नावाच्या गांजाचा अर्थ हा “ओजी” म्हणजे ओरिजनल आणि “कुश” ही त्याची जात आहे. त्यामुळे त्याला ओजी कुश असे म्हणतात, असे वरिष्ठ निरीक्षक घेवारे यांनी सांगितले. तर हा गांजा अमेरिका, अफगाणिस्तान येथे 1 हजार रुपये ग्रॅम मिळतो. पण भारतात त्याची किंमत साधारण 3 ते 5 हजार रुपये होते. दरम्यान हा गांजा केवळ उच्चभ्रू लोकांमध्येच फेमस असून, त्यांच्यासाठी हा गांजा आणला जातो.