Pune News : TATA ने मुळशी धरणातून होणारी वीज निमिर्ती बंद, कमी करून पुणे अन् पिंपरी-चिंचवडला पाणी द्यावे – अजित पवार

पुणे : राज्यात सरप्लस वीज आहे. त्यामुळे टाटा ने मुळशी धरणातून होणारी वीज निर्मिती बंद कमी करून पुणे, पिंपरी चिंचवडला पाणी द्यावे यासाठी प्रयत्न केले जातील, तसेच भामा आसखेडच्या पाण्याबदल्यात महापालिकेने देणे असलेले 260 कोटी रुपये माफ करण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत प्रयत्न करेन असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी दिले.

नगररस्ता परिसरात पाणी पुरवठ्यासाठी महापालिकेच्यावतीने उभारण्यात आलेल्या भामा आसखेड योजनेचे लोकार्पण उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार आणि विधी मंडळाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. महापालिकेच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी भाजपचे प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, यांच्यासह शहरातील आमदार, विभागीय आयुक्त सौरभ राव, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी राजेश देशमुख , उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेता गणेश बिडकर, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, 1991 मध्ये पुण्याला 5 टीएमसी पाणी लागायचे. लोकसंख्या वाढली. आता 18 टीएमसी लागतेय. पुण्याची गरज आहे, देतोय उपकार करत नाही. परंतु यामुळे पुढे शेतीला पाणी कमी पडू लागले. त्यामुळे भामा आसखेड योजना पुढे आणावी लागली . पुण्याच्या भौगोलिक जलसंपदा ची लोक भेटली. भामा आसखेड योजना सुरू झाले की खडकवासाला चे 2 टीएमसी पाणी शेतीला दिल्यास एक आवर्तन होईल , असे सांगत आहेत. ग्राम पंचायत निवडणुका झाल्या की बैठक घेऊन यातून मार्ग काढू. जीएनएनयूआरएम माध्यमातून केंद्र व राज्य सरकारने निधी दिला. दिवंगत आमदार सुरेश गोरे यांनी प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन करण्यासाठी आग्रही राहिले. भामा आसखेड मधून पाणी उचलण्यासाठी राज्य सरकारने 260 कोटी मागितले आहे. पालिकेने या प्रकल्पासाठी खूप खर्च केला आहे. त्यामुळे हे 260 कोटी रुपये घेतले जाणार नाही यासाठी मी मंत्री मंडळात प्रयत्न करेन.

धरणातून स्वच्छ पाणी घेत असताना खालील जनतेला दूषित पाणी देणार नाही याची खबरदारी घ्यावी. नदीसुधार च्या कामात सगळ्यांनी एकत्रित यावे. 23 गावे घेताना हजारो कोटी रुपयांचा निधी मागितला जातोय. कोरोनाच्या परिस्थितीमुळे राज्याची आर्थिक स्थिती खराब आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, विस्तारित होत असलेल्या पुण्यासाठी हा प्रकल्प महत्वाचा आहे. अनेक भागात पाण्याची कमतरता जाणवत होती. पुणेकरांना नवीन वर्षाची भेट मिळाली आहे. या कार्यक्रमाची उत्कंठा आमच्यापेक्षा मीडियाला अधिक होती. मी आणि दादा एकाच व्यासपीठावर एकत्र येणार म्हणून. राज्याची विकास कामांसाठी एकत्र येण्याची परंपरा आहे. योजना करताना अनेक अडचणी आल्या. गिरीश बापट यांनी देखील यासाठी अनेक बैठका घेतल्या. सर्वच पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले. शहरीकरण वाढत जाणार आहे. रोजगारामुळे स्थलांतर शहराच्या दिशेने होत आहे. हे अपरिहार्य आहे. शहर बकाल होणार नाही यासाठी पाणी पुरवठा, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन महत्वाचे राहणार आहे. परंतु हे करत असताना शहर आणि ग्रामीण असा वाद होत असतो. शेतीसाठी प्रक्रिया केलेले पाणी उपलब्ध करून दयावे लागणार आहे. येत्या काळात उद्योगांना प्रक्रिया केलेले पाणी दिल्यास हा संघर्ष कमी होईल. पाणी ही निसर्गाची देणगी असली तरी ती इकॉनॉमिक कमोडिटी आहे. सार्वत्रिक विचार केल्यास पाण्याचे योग्य नियोजन करावे लागणार आहे.

शहरात इ बसेस वाढवण्यात येत आहे. मेट्रो चे गतीने काम सुरू आहेत. अजित पवार त्याला गती देत आहेत. सर्वच जण एकत्र येऊन काम केल्यास पुणे जागतिक स्तरावरची सिटी होईल. एचसीएमटीआर साठी पालकमंत्री म्हणून अजित पवार नकीच सकारात्मक पर्याय पुढे आणतील.

चंद्रकांत पाटील म्हणाले, ही महत्वाकांक्षी योजना आहे. वाढत्या लोकसंख्येची गरज यातून भागवली जाईल. ही योजना पूर्ण होत असताना खडकवासला धरणांतून मिळणारे पाणी कमी होऊ नये. नवीन गावे पालिकेत येत आहेत. याचा विचार करून चोवीस तास पाणी आणि सांडपाणी वाहून नेण्यासाठी योजना एकत्र बसून विचार करावा लागेल. प्रामुख्याने पाटबंधारे विभागातील विषय मार्गी लावावा लागेल. शेतीला व पिण्याला पुरेसे पाणी मिळेल यासाठी विचार करावा लागेल. विकासात हातात हात घालून विकास न केल्यास अडचणी निर्माण होतील. अजित पवार या अडचणी सोडवतील अशी अपेक्षा.

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्वागत करताना नववर्षा निमित्त नगररस्ता परिसरातील नागरिकांना मोठी भेट आहे. यावेळी त्यांनी प्रकल्पाच्या जडणघडणीची माहिती दिली. या नवीन प्रकल्पामुळे कुठलीही पाणी कपात करू नये, अशी विनंती त्यांनी यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांना केली. सर्व पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन हा प्रकल्प तडीस नेला.

हा प्रकल्प पूर्णत्वास नेणारे शहर अभियंता प्रशांत वाघमारे, मुख्य अभियंता विजय कुलकर्णी, अधीक्षक अभियंता प्रवीण गेडाम, अधीक्षक अभियंता युवराज देशमुख, कार्यक्रम अभियंता सुदेश कडू यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्तकार करण्यात आला.

या प्रकल्पामुळे काही जणांच्या पोटात दुखत असेल. विशेषतः टँकर माफियांच्या पोटात गोळा आला असेल, कशाला उभारला प्रकल्प असे म्हणत असतील. चंदननगर , खराडी परिसरात कधी गेले की नागरिक म्हणायचे काही नको आम्हाला पाणी द्या, असा टोला अजित पवार यांनी यावेळी लगावला. यावेळी व्यासपीठावर वडगाव शेरीचे माजी आमदार बापूसाहेब पठारे उपस्थित होते.