Pune News : फुरसुंगीच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; ट्रकने दाम्पत्याला चिरडले, पत्नी जागीच ठार तर पती आणि दोन मुले जखमी

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – हडपसर येथील फुरसुंगीकडे जाणाऱ्या मंचरवाडी ब्रिजवर भारत पेट्रोलियमच्या भरधाव टँकरने दुचाकीवरून जाणाऱ्या दाम्पत्याला जोरात धडक दिली. यात पत्नी दोन्ही टायरच्या खाली आल्याने चिरडली गेली. तर त्यांचे पती व दोन मुले जखमी झाले आहेत.

लक्ष्मी प्रमोद मालुसरे (वय 32) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. तर त्यांचे पती प्रमोद मालुसरे (38) हे गंभीर जखमी झाले आहेत. तर त्यांची मूल देखील किरकोळ जखमी झाले आहेत. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. टँकर चालक घटनस्थळावरून पसार झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालुसरे कुटुंब फुरसुंगी येथे राहण्यास आहे. ते सकाळी सकाळी त्यांच्या दुचाकीवरुन भोर गावी निघाले होते. प्रमोद हे दुचाकी चालवत होते. तर मागे पत्नी आणि दोन लहान मूल बसलेली होती. दरम्यान मंचरवाडी ब्रिजवरून जात असतानाच पाठीमागून आलेल्या भारत पेट्रोलियम टँकरने त्यांना जोरात धडक दिली. त्यात पत्नी लक्ष्मी या चाकी खाली आल्या. त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर पती गंभीर जखमी झाले आहेत. सुदैवाने दोन लहान मुले किरकोळ जखमी झाले असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. घटना घडताच याची माहिती हडपसर पोलिसांना मिळाली. त्यांनी तात्काळ मार्शलला घटनास्थळी पाठवले. दरम्यान नागरिकांनी रुग्णवाहिकेला बोकवत मुलांना व पतीला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, तपास सुरू केला आहे.