Pimpri News : शारिरीक संबंधाचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी मागणारा तोतया पत्रकार गजाआड

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – डिव्होर्सी मॅट्रिमोनी साईटवरून ओळख झालेल्या घटस्फोटीत महिलेसोबत लीव्ह इन मध्ये राहून शारिरीक संबंधाचे व्हिडीओ बनवले. तसेच पत्रकार असल्याची बतावणी करुन शारिरीक संबंधाचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत सहा लाखाची खंडणी मागणाऱ्या तोतया पत्रकाराला सायबर सेलच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. राजीव पटेल उर्फ राजीव परमान असे अटक करण्यात आलेल्या तोतया पत्रकाराचे नाव आहे. आरोपीने महिलेला आपले नाव अहमद याकुब लखानी (रा. कोंढवा) असे सांगितले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि आरोपी यांची ओळख डिव्होर्सी मॅट्रिमोनी साईटवरून झाली. पीडित महिला ही घटस्फोटीत असून आरोपीने स्वत: घटस्फोटीत असल्याचे सांगितले. आरोपीने महिलेसोबत ओळख वाढवली. फोनवरील संपर्क, मेसेज आणि प्रत्यक्ष भेटीनंतर दोघांनी लीव्ह इन मध्ये राहण्याचा निर्णय घेतला. लीव्ह इनमध्ये रहात असताना आरोपीने महिलेसोबतच्या शारिरीक संबंधाचे चित्रीकरण केले.

काही दिवसांनी पीडित महिलेकडे वैयक्तिक अडचण असल्याचे सांगून पैशांची मागणी केली. आरोपी महिलेकडे सतत पैशांची मागणी करत असल्याने महिलेने त्याच्यापासून वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर एका अनोळखी नंबरवरून महिलेला शारिरीक संबंधाचे व्हिडीओ पाठवून तो पत्रकार असल्याची बतावणी केली. तसेच हे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत सहा लाख रुपयांची खंडणी मागितली. पीडित महिलेने वाकड पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दाखल केली. सायबर पोलीस आणि वाकड पोलिसांनी समांतर तपास करून आरोपीला शनिवारी (दि.16) कोंढवा येथून अटक केली.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे व सायबर सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय तुंगार यांच्या मार्गदर्शनाखाली, सहायक पोलीस निरीक्षक सागर पानमंद, पोलीस अंमलदार अतुल लोखंडे, भास्कर भारती, नितेश बिचेवार यांच्या पथकाने केली.पुढील तपास वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) संतोष पाटील हे तपास करीत आहेत.