Pune News : ‘पॉलीकॅब’च्या नावाने बनावट वायर बनविणारे, विक्रीसाठी मागविणार्‍यांमधील दुवा असलेल्या वाहतूकदारास अटक, राजपुरोहितला यापुर्वीच झालीय अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पॉलीकॅब कंपनीच्या नावाने बनावट इलेक्ट्रिक वायर बनविणारे व ती विक्रीसाठी मागविणा-यांमधील महत्त्वाचा दुवा असलेल्या वाहतूकदारास फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे. बनावट वायर तयार करून त्याची विक्री करण्याचे सत्र गेल्या चार वर्षांपासून शहरात सुरू होते, असे पोलिस तपासातून समोर आले आहे.

रमेशकुमार अमरसिंग कोंडल (वय ४६, रा. हडपसर, मुळ रा. हिमाचल प्रदेश) असे या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात पुर्वी दिनेशसिंग रुपसिंग राजपुरोहीत (वय ४२, रा. शुक्रवार पेठ) याला अटक करण्यात आली आहे. विनोदकुमार श्रीजयचंद करपासिया (वय ३९, रा. दिल्ली) यांनी फिर्याद दिली आहे. राजपुरोहितच्या गोडाऊनवर छापा टाकून बनावट वायर, पॅकींगसाठी लागणारे कंपनीच्या नावाचे बॉक्‍स व अन्य साहित्य असा ४३ लाख रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला. या गुन्ह्यात एकूण तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या चार वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. वायर, गॅस शेगडी, रेग्युलेटर, एलपीजी गॅस पाईप आणि कुकर अशा बनावट मालाची वाहतूक करून आरोपीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जिवास धोका निर्माण झाला आहे. गुन्ह्याची व्याप्ती मोठी आहे. त्या अनुषंगाने कोंडलकडे चौकशी करायची आहे. अधिकृत कंपनी वायर व बॉक्स वेगवेगळे पाठवीत नाही, हे माहिती असतानाही कोंडल याने त्याच्या ट्रान्सपोर्टच्या मदतीने त्या मालाची वाहतूक केली. त्यामुळे त्याला पोलिस कोठडी देण्याचा युक्तिवाद सरकारी वकील सुरेखा क्षिरसागर यांनी केला. त्यानुसार न्यायालयाने आरोपीची चार दिवसांसाठी पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

यामुळे केली कारवाई –

बनावट इलेक्‍ट्रीक वायरींचा वापर केल्याने शॉर्टसर्किट होऊन इमारतींना आग लागून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याच्या घटना शहरामध्ये घडत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. अशा प्रकारे बनावट व निकृष्ट दर्जाच्या वायर वापरल्याने होणाऱ्या गंभीर अपघातांना आळा बसावा, यादृष्टीने अशा वायरची विक्री करणाऱ्या इलेक्‍ट्रिक व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात येत आहे.