Pune News : महिलांच्या डोक्यावरील हंडा कधी उतरणार, पालिका समावेशामुळे मूलभूत सूविधा तरी मिळतील

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षांचा कालावधी लोटला तरीसुद्धा आम्हाला पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नाही, अशी शोकांतिका पालिकेच्या उंबरठ्यावरील गावांतील नागरिकांनी व्यक्त केली. शहराच्या पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण भागातील महिलांच्या डोक्यावरील हंडा कधी उतरणार असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हाध्यक्ष, पंचायत समिती सभापती, ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्य अशी नावांची मोठी जंत्री आहे. दर पाच वर्षांनी निवडणुका येतात आणि आश्वासनांचा महापूर येतो. मात्र, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अद्याप सुटला नसल्याने पाण्यासाठी भटकंती कायम आहे.

पुणे महापालिकेच्या उंबरठ्यावरील 23 गावे महापालिकेत समाविष्ट केली जाणार आहेत, त्यामध्ये गुजर – निंबाळकरवाडी, भिलारेवाडी, मांगडेवाडी, जांभूळवाडी आणि कोळेवाडी या गावांचा समावेश आहे. तलावाच्या कडेला असलेल्या गावांना वापरण्याचे पाणी मिळत असले, तरीही पिण्याच्या पाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे महापालिकेत समाविष्ट होताना येथील नागरिकांना पिण्याचे मुबलक पाणी मिळावे, अशी अपेक्षा गावकरी व्यक्त करत आहेत.

महापालिकेत नव्याने समाविष्ट होऊ घातलेल्या २३ गावांमध्ये येत असलेल्या गुजर-निंबाळकरवाडी, भिलारेवाडी, मांगडेवाडी, जांभूळवाडी आणि कोळेवाडी या गावांतील पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर असल्याचे दिसून आले. गुजर – निंबाळकरवाडी कात्रजच्या हद्दीला लागूनच आहे. वाढत्या शहरीकरणामुळे लगतच्या गावचे मागिल काही वर्षांपासून नागरीकरण वाढत आहे. या परिसरात उंच उंच इमले तयार होत आहेत. गुंठेवारीतील बांधकामेदेखील झाली आहेत. मात्र, हा विस्तार होताना पायाभूत सुविधांचा विस्तार झालेला दिसत नाही.

बांधकाम करताना घराभोवती पुरेशी जागा सोडलेली नाही. कात्रज घाटाकडे जातानाच्या मुख्य रस्त्यावर मांगडेवाडी आणि भिलारेवाडी गावे आहेत. या गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सिमेंट क्राँक्रिटचे रस्ते करण्यात आले आहेत. मात्र, रस्ते अरुंद आहेत. घरांची उभारणी करतानादेखील नियोजनाचा अभाव असल्याचे दिसून आले.

नियोजनबद्ध विकास व्हावा
पालिका हद्दीलगत गावे असल्यामुळे या गावांत मोठ्या संख्येने बांधकामे सुरू आहेत. खडी, क्रशरच्या व्यवसायांमुळे येथे धूलिकणांचे प्रमाण अधिक आहे. नागरिकांना अन्य गैरसोयींसह धूलिकणांपासूनही सुटका हवी आहे. त्यासाठी पालिकेने दर्जेदार रस्ते आणि आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे नागरिकांना वाटते.

कात्रजमधील सामाजिक कार्यकर्ते विकासनाना फाटे म्हणाले की, महापालिकेत समाविष्ट झाल्यास गावाचा नियोजनबद्ध विकास होऊ शकतो. सध्या गावात शेती आणि हिल टॉप झोन सर्वाधिक आहे. मात्र, भविष्याची गरज ओळखून निवासी झोन वाढवण्यात यावा. पिण्याचे पाणी, रस्ते, आरोग्य या सुविधा चांगल्या प्रकरे मिळाल्या पाहिजेत. जांभूळवाडीतील नागरिकांना सध्या पिण्याचे बऱ्यापैकी विकतच आणावे लागते. वापरावयाच्या पाण्याची सोय ग्रामपंचायतीने तलावातून केली आहे.

मात्र, त्या तलावात ड्रेनेजद्वारे सांडपाणी सोडले जात आहे. त्यामुळे ड्रेनेज व्यवस्था प्राधान्याने उभारली पाहिजे. भिलारेवाडीतील मूळ ग्रामस्थांनी वापरावयाच्या पाण्यासाठी बोअर घेतलेले आहेत. मात्र, भाडेकरूंचे पाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर हाल होतात. अनेकांना कात्रजवरून पिण्याचे पाणी आणावे लागते. गाव महापालिकेत गेल्यानंतर पाण्याची समस्या प्राधान्यक्रमाने सुटली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.