Pune News : हडपसरमधील लोहिया उद्यान सुरू होण्यासाठी मुहूर्त कधी मिळणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली 60 उद्याने दिवाळीच्या दरम्यान सुरू केली. मात्र, नागरिकांच्या बेशिस्तपणामुळे पुन्हा बंद करण्यात आली. मागिल आठवड्यात 25 जानेवारी रोजी पुन्हा 60 उद्याने सुरू करण्याची कारवाई महापालिका प्रशासनाने दिली. मात्र, अद्याप अनेक उद्याने सुरू झाली नाहीत, त्यामध्ये हडपसरमधील डॉ. राम मनोहर लोहिया उद्यानाचा समावेश आहे. मागिल आठ दिवसांपासून नागरिक दररोज सकाळी आणि सायंकाळी उद्यानाच्या प्रवेशद्वारासमोर येऊन थांबतात आणि निघून जातात. उद्यान कधी उघडणार याची आतुरतेने वाट पाहात आहेत. उद्यान बंद आहे, तर दररोज सायंकाळी दिवाबत्ती करण्यासाठी कर्मचारी का येतो, उद्यान सुरू करण्यासाठी पालिका प्रशासन मुहूर्त पाहात आहे का, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

पालिका प्रशासनाने उद्याने खुली करण्याचा मोठा गाजावाजा केला, त्यासंबंधीचे वृत्तही वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झाले. त्यामुळे नागरिकांनी आज सोमवारी सकाळी उद्यानासमोर गर्दी केली होती. मात्र, उद्याने सुरू न झाल्यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. आता उद्याने नेमकी कधी सुरू होणार आहेत, याविषयी कोणीही थेट माहिती देत नाहीत. हडपसरमधील डॉ. राम मनोहर लोहिया उद्यान सुरू होणार असल्याची बातमी आम्ही वृत्तपत्रामध्ये वाचली होती. त्यामुळे आज सकाळी वॉकिंगसाठी आलो होतो. मात्र, उद्यान बंद असल्याने आमचा हिरमोड झाल्याचे राजेंद्र राऊत यांनी सांगितले. माझ्यासह अनेकजण आज उद्यानामध्ये फिरण्यासाठी आले होते. महापालिकेच्या उद्यान विभागाने हडपसरमधील उद्याने कधी सुरू केली जाणार आहेत, याचा खुलासा केला तर नागरिकांनी फसगत होणार नाही, असे नागरिकांनी स्पष्ट केले.

उद्याने सुरू होताच उद्यानाच्या प्रवेशद्वारासमोर कारले, गव्हांकूर, लिंबू असे विविध प्रकारचे ज्यूस विक्रेते गर्दी करणार आहेत. तसेच वडापाव, चहाची दुकानेही थाटली जाणार आहेत. आता मगरपट्टा चौकातील डॉ. राम मनोहर लोहिया उद्यानासमोर खेळणी, खाद्यपदार्थ विक्रेत्यांची सायंकाळी गर्दी होत असते. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होणार नाही, यासाठीही उद्यान विभागाने दक्षता घेणे गरजेचे आहे.

स्वच्छतागृह कर्मचारी अंधारात

हडपसरमधील मगरपट्टा चौकातील डॉ. राम मनोहर लोहिया उद्यानामध्ये स्वच्छतागृहाचे कर्मचारी आले आहेत. त्यांच्या घरातील दिवे बंद आहेत, पाण्याची व्यवस्था नाही. पाण्याची व्यवस्था नाही, हडपसर गावातील प्रा. ग. प्र. प्रधान नक्षत्र उद्यान, गोंधळेनगरमधील हेमंत करकरे उद्यान अशी अनेक उद्याने बंद आहेत. या उद्यानांमधील स्वच्छतागृहांमध्ये पाण्याचे नळ चोरीला गेले आहेत. दरवाजांच्या कडीकोयंडे तुटले आहेत. वॉकिंग ट्रॅकची दूरवस्था झाली आहे.