Pune : कुविख्यात गुन्हेगार निलेश बसवंतला गुन्हे शाखेनं खेड शिवापूरजवळ पकडलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोर्टात बनावट कागदपत्रे देऊन जामीन मिळवल्यानंतर पसार असणाऱ्या कुविख्यात गुन्हेगार निलेश श्रीनिवास बसवंत (वय 32) याला गुन्हे शाखेच्या युनिट एकने पकडले आहे. खेड शिवापूर टोलनाक्याजवळ त्याला पकडण्यात आले आहे.

याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याबाबत गुन्हे शाखा अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी तक्रार दिली आहे. कोंढवा पोलिस ठाण्यात २०१५ मध्ये बसवंत याच्यासह इतरांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात त्याच्यासह इतर आरोपींवर मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. या गुन्ह्यात बसवंतला अटक केली. तो कारागृहात होता. गेल्या वर्षी जुलै महिन्यात कोर्टाने त्याला जामीन मंजूर केला. यावेळी त्याने कॅन्सर आजार झाल्याचे कारण देत सातारा येथील ऑनेको कॅन्सर सेंटर शेंद्रे यांच्या लेटर हेडवर वैद्यकीय प्रमाणपत्र कोर्टात सादर केले होते. त्यामध्ये चार केमोथेअरपी आवश्यक असल्याचे म्हटले होते.

या जामीनाच्या वेळी सादर केलेल्या वैद्यकीय प्रमाणपत्राबाबत चौकशी करण्याचे आदेश वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी निरीक्षक विनायक गायकवाड यांना दिले होते. त्यानुसार त्यांनी त्या वैद्यकीय प्रमाणपत्राची चौकशी केली. त्यात बसवंतने सादर केलेले वैद्यकीय प्रमाणपत्र हे बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे. याबाबत संबंधीत डॉक्टरला चौकशीसाठी बोलविले होते. त्यांचा जबाब घेण्यात आला आहे. त्यांनी ते प्रमाणपत्र त्यांनी दिले नसल्याचे सांगितले आहे. तसेच, त्यावरील सही देखील बनावट होती. हे वैद्यकीय प्रमाणपत्र बनविण्यास कोणी मदत केली का, यामध्ये इतरांचा सहभागाबाबत तपास सुरू होता. दरम्यान बसवंत हा यानंतर पसार झाला होता. त्याचा शोध घेतला जात होता. मात्र तो सापडत नव्हता. गुन्हे शाखा त्याच्या मागावर होती. यादरम्यान तो कोल्हापूर परिसरात असल्याचे समजले. त्यानुसार माहिती काढण्यात आली. त्यावेळी तो खेड शिवापूर टोलनाका परिसरात असल्याचे निष्पन्न होताच त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

निलेश बसवंत हा कुख्यात बापू नायर टोळीचा महत्वाचा सदस्य आहे. त्याच्यावर 12 गंभीर गुन्हे दाखल आहेत. दोन वेळा बसवत व या टोळीवर मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. टोळीचा प्रमुख नायर हा सध्या कारागृहात आहे.

ही कारवाई उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदनाखाली वरिष्ठ निरीक्षक सुनील ताकवले, उपनिरीक्षक सुनील कुलकर्णी यांच्या पथकाने केली आहे.