Pune : पूर्व हवेलीत व्हेंटिलेटर बेड उपलब्ध नसल्याने रुग्णांची तडफड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, उपचाराविना रुग्णांची तडफड होत असल्याचे पाहून नातेवाईकांचा जीव तीळतीळ तुटत आहे. प्रशासन मात्र अद्याप ढिम्म आहे. व्हेंटिलेटर बेडवरील रुग्णाला १५ दिवसांचा कालावधी बरे होण्यासाठी लागत आहे. त्यामुळे व्हेंटिलेटर बेड मिळत नसल्याने रुग्णांवर रामभरोसे उपचार सुरू ठेवण्याशिवाय पर्याय नसल्याचे रुग्णालयांकडून बोलले जात आहे. हडपसरमधील एका रुग्णाच्या नातेवाईकांनी ५८ हॉस्पिटलमध्ये चकरा मारल्या मात्र त्यांना व्हेंटिलेटर बेड मिळाला नाही. आमदार, नगरसेवक, धडाडीचे कार्यकर्त्यांचे उंबरे झिजवले, तरीसुद्धा काही उपयोग झाला नाही, अशा भयावह परिस्थिती कोरोनाबाधितांची झाली आहे.

मागिल दोन महिन्यांपासून कोरोनाने उग्र रूप धारण केले आहे. त्यामुळे व्हेंटिलेटर बेड, प्लाझ्मा मिळत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची पुरे वाट लागली आहे. मागिल वर्षभरापासून रोजगार नाही, कोरोनाचे रौद्ररूप, उन्हाचा कडाका अशा भयावह कात्रीत नागरिक सापडले आहेत. रुग्णांना बेड मिळत नाहीत, त्यामुळे रुग्णांची तडफड पाहवत नाही. सामान्य नागरिकांना कोणी वालीच उरला नाही. राज्य आणि केंद्र सरकारने तातडीने रुग्णांवर उपचार करण्यासाठीचे नियोजन करावे, अशी आर्जवी मागणी सामान्यांकडून होत आहे. शासकीय रुग्णालयामध्ये कुठेच बेड शिल्लक नाही, हे नवीन नाही. मात्र, खासगी रुग्णालयामध्ये बेड शिल्लक नाही, ही बाब निश्चितच विचार करायला लावणारी आहे. रुग्णांची मृत्यूनंतरही हेळसांड होऊ लागली आहे. स्मशानभूमीमध्येही आता वेटिंगवर थांबावे लागत असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे.

हवेली तालुक्यातील कदम-वाकवस्ती, लोणी काळभोर, कुंजीरवाडी, उरुळीकांचन, म्हातोबाची आळंदी, सोरतापवाडी आदी गावांमधील कोरोनाबाधितांचा आकडा उच्चांक गाठत आहे. शासकीय रुग्णालयामध्ये बेड शिल्लक नाही, म्हणून अनेकांनी नामांकित खासगी रुग्णालयांकडे धाव घेतली आहे. रुग्णालयात दाखल झाले की, सीटी स्कॅन करण्याची ऑर्डर सोडली जात आहे. सीटी स्कॅन करण्यासाठी दहा-पंधरा मिनिटांचा कालावधी लागत आहे. रुग्णसंख्या जास्त असल्यामुळे रुग्णांना तासंतास रांगेत ताटकळत थांबावे लागत आहे. आजाराने बेजार झालेल्या रुग्णांना बसण्यासाठी खुर्चीसुद्धा नसल्याने त्यांचा जीव कासावीस होत असल्याचे पाहून मनस्ताप होत असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

हॉस्पिटलमध्ये नियोजनाचा अभाव असल्यामुळे रुग्ण आणि नातेवाईकांमुळे हॉस्पिटलमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. ज्येष्ठ आणि अपंग रुग्णांना बसण्याची व्यवस्था नसल्याने रुग्णांची पुरे वाट लागली आहे. रुग्ण संख्या आणि उपलब्ध रुग्णालयांमधील व्हेंटिलेटर बेडचा मेळ बसत नाही. त्यामुळे बेड मिळविताना नागरिकांची दमछाक होत आहे. लोणी काळभोर (ता. हवेली) येथील सुसज्ज म्हणविणाऱ्या रुग्णालयामद्ये आसपासच्या 25 गावातील रुग्णांची गर्दी होत आहे. रुग्णांना बसण्यासाठी साध्या खुर्च्यासुद्धा उपलब्ध नाहीत. रुग्णांच्या नातेवाईकांनी त्याविषयी संबंधिताकडे विचारणा केली, तर त्यांनी सांगितले तुम्ही खुर्च्या डोनेट करा, त्यावर तुमचे नाव टाकतो, अशा पद्धतीने रुग्णालयातील अधिकारी वर्ग बेशिस्तपणे वागणूक देत असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.