नगरसेविकेचा भाजपला घरचा आहेर ! पाण्यासाठी केले ‘शोले’ स्टाईल आंदोलन

पिंपरी-चिंचवड : पोलीसनामा ऑनलाईन – कमी दाबाने पाणी येत असल्याने एका नगरसेविकेने चक्क टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले आहे. सुजाता पलांडे असं या नगरसेविकेचे नाव असून या भाजपच्याच आहेत. प्रभाग क्रमांक २० मध्ये गेली सहा दिवसांपासून कमी दाबाने पाणी येत आहे, त्यावरून तक्रारी करूनही ही समस्या सोडवता आली नाही. त्यामुळे सुजाता पलांडे यांनी पिंपरी-चिंचवडमधील टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले आहे.

गेली सहा दिवस कमी दाबाने पाणी येत आहे, तर कुठे पाणीच येत नसल्याची तक्रार त्यांच्याकडे नागरिकांनी केली होती. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. मात्र, त्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्यामुळे आंदोलन करावे लागल्याचे सुजाता यांनी सांगितले आहे. सुजाता या भाजपच्याच आहेत. त्यात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भाजपाचीच सत्ता आहे. तरीही त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्षित करण्यात आले. त्यामुळे सुजाता यांनी भाजपला चांगलाच घरचा अहेर दिला आहे.

सध्या पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण हे चांगले भरले आहे. त्यामुळे शहरात नियमित पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र, प्रभाग क्रमांक २० संत तुकाराम नगर, महात्मा फुले नगर या परिसरात गेल्या सहा दिवसांपासून कमी दाबाने पाणी येत आहे. तर काही ठिकाणी पाणीच येत नसल्याची तक्रार सुजाता पालांडे यांच्याकडे नागरिकांनी केली होती. या प्रकरणी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या होत्या. परंतु, सुजाता यांच्या सूचनांकडे पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. त्यावर वैतागलेल्या नगरसेविका सुजाता पलांडे यांनी अखेर नेहरु नगर येथील पाण्याच्या टाकीवर जाऊन शोले स्टाईल आंदोलन केले.

दरम्यान, त्यानंतर जो पर्यंत संबंधित अधिकाऱ्यांनी आश्वासने दिली नाहीत तोपर्यंत पालांडे यानी आंदोलन मागे घेतले नाही. अखेर अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर पलांडे यांनी आंदोलन मागे घेतले.