Pune : ‘होम आयसोलेशन’मध्ये असलेल्या रुग्णांवर ‘वॉच’ ठेवण्यासाठी ‘अ‍ॅप’ विकसित; पुणे महापालिकेचा प्रयत्न

पुणे – गृह विलगिकरणात अर्थात होम आयसोलेशन असलेल्या कोरोना रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी पुणे महापालिकेने अ‍ॅप विकसित केले आहे. या अ‍ॅप मुळे कोरोना रुग्ण घराबाहेर पडला तरी महापालिकेला समजणार असून रूग्णाची ऑक्सिजन लेवल, ताप आदीची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाला समजणार त्यानुसार उपचार व मार्गदर्शन करणे सोपे होणार आहे.

कोरोना च्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणावर संसर्ग वाढला आहे. सध्या पुणे शहरात 54 हजार ऍक्टिव्ह रुग्ण असून यापैकी सौम्य लक्षणे असलेले 48 हजार रुग्ण गृह विलगिकरणात ( होम आयसोलेशन) आहेत. यामध्ये काही कुटुंबच्या कुटुंब आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या असल्याने त्यांना मोनेटरिंग करणे अवघड जात आहे. तसेच होम आयसोलेशन मध्ये असलेल्या रुग्णांची प्रकृती खालवल्यानंतर त्यांना तातडीने उपचार मिळणे अवघड झाले आहे.

यापार्श्वभूमीवर महापालिकेने होम आयसोलेशन रुग्णांचे मोनेटरिंग करण्यासाठी स्वतंत्र अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे. या अ‍ॅपचे उद्या उदघाटन करण्यात येणार आहे. होम आयसोलेशन मध्ये राहणाऱ्या रुग्णांना मोबाईल वर हे अ‍ॅप डाउनलोड करणे बंधनकारक राहणार आहे. या अ‍ॅपमध्ये रुग्णाने त्याची ऑक्सिजन लेव्हल, तापमान व अन्य काही त्रास होत असेल त्याची नोंद रुग्णांने अथवा त्याच्या नातेवाईकाने करणे बंधनकारक राहणार आहे. रुग्णांची ऑक्सिजन लेवल कमी झाल्याचे अथवा ताप व अन्य लक्षणे दिसल्यास महापालिकेच्या डॅशबोर्ड वर समजणार आहे. तसेच हे अ‍ॅप डाऊन लोड केलेला हा मोबाईल रुग्णासोबत ठेवणे बंधनकारक राहणार आहे. कोरोना रुग्ण बाहेर गेल्यास त्याचीही माहिती डॅशबोर्ड वर दिसणार आहे.