Pune PMC News | घरातील खराब गाद्या, उश्या, फर्निचर, ई- कचरा टाकायची चिंता सोडा ! महापालिका 14 ऑक्टोबरपासून हा कचरा गोळा करण्यासाठी तुमच्या भागात राबवतेय विशेष मोहीम

देवघरातील खराब झालेले पूजा साहित्यही गोळा करण्यासाठी 28-29 ऑक्टोबरला खास मोहीम

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune PMC News | दसरा, दिवाळी निमित्त घरांच्या रंगरंगोटी आणि स्वच्छतेच्यावेळी मोठ्या प्रमाणावर निरुपयोगी साहित्य कचर्‍यात टाकण्यात येते. असे साहित्य गोळा करण्यासाठी महापालिका येत्या १४ तारखेपासून विशेष मोहीम सुरू करणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी दिली. (Pune PMC News)

दसरा, दिवाळी या मोठ्या सणांच्यावेळी घरांची स्वच्छता आणि नवीन वस्तु खरेदीकडे नागरिकांचा कल असतो. या काळात फर्निचर, इलेक्ट्रॉनीक वस्तू, गाद्या, उश्या, कपडे या सारख्या वस्तुंची मोठया प्रमाणावर खरेदी होते. त्याचवेळी जुन्या वस्तू एकतर भंगारात दिल्या जातात.ज्या भंगारात जात नाहीत त्या कचर्‍यात टाकल्या जातात. या वस्तुंचा पुर्नवापर , रिसायकल आणि विघटन करण्यासाठी महापालिका मागील काही वर्षांपासून विशेष प्रयत्न करत असून त्याला नागरिकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. यंदाही येत्या १४ ऑक्टोबरपासून महापालिका चिंध्या, उश्या, गाद्या, जुने फर्निचर गोळा करण्याची मोहीम सुरू करणार आहे. प्रत्येक प्रभागातील किमान दोन आरोग्य कोठ्यांमध्ये सकाळी दहा ते चार या वेळेत या वस्तू स्वीकारल्या जातील. (Pune PMC News)

यासोबतच ई वेस्ट गोळा करण्याच्या मोहीमेची अधिक व्यापक करण्यासाठी ५ नोव्हेंबरपासून महापालिका, जनवाणी, कमिन्स इंडिया, पूर्णम इकोव्हीजन, सागर मित्र, थंब क्रिएटीव्ह, आदर पूनावाला क्लीन सिटी इनिशिएटीव्ह व इतर शैक्षणिक व सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील विविध ३०० ठिकाणी ई कचरा व प्लास्टिक कचरा संकलन महाअभियान राबविणार आहे.ही ठिकाणी लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे कदम यांनी नमुद केले आहे. नागरिकांनी या उपक्रमामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावी आणि सहकार्य करावे, असे आवाहन कदम यांनी केेले आहे.

देवी, देवतांचे खराब झालेले फोटो व वस्तु संकलन

देव्हार्‍यातील देवी, देवतांचे खराब झालेले फोटो, मुर्ती व अन्य साहित्य अनेकदा नदीत विसर्जन केले जाते. नदी अथवा तलावांचे प्रदूषण रोखण्यासाठी मागील काही वर्षांपासून अशा विसर्जनास बंदी घालण्यात आलेली आहे. यामुळे अनेकदा नागरिक रस्त्याच्या कडेला अथवा नदीपात्र, तलावांच्या बाजूला किंवा झाडांच्या बुंध्यांशी हे फोटो, मुर्ती ठेवतात. या पार्श्‍वभूमीवर त्याचे पावित्र्य राखले जावे यासाठी महापालिका देवीदेवतांसंबधित सर्व वस्तू व साहित्य गोळा करण्या करिता २८ आणि २९ ऑक्टोबर रोजी विशेष मोहीम घेणार आहे. महापालिकेच्या प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाने निश्‍चित केलेल्या जागेवर सकाळी १० ते दुपारी चार वाजेदरम्यान या वस्तु स्वीकारणार आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | तुमच्या पार्सलमध्ये ड्रग्स आहे म्हणत पुण्यातील ज्येष्ठ नागरिकाला 18 लाखांचा गंडा