बंद असणारे फ्लॅट फोडणाऱ्या शिकलकरी टोळीला वानवडी पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात फिरून बंद असणारे फ्लॅट फोडणाऱ्या शिकलकरी टोळीला वानवडी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून १३ गुन्हे उघडकीस आणत सोने-चांदी, चार मोटारी, तीन दुचाकी असा मिळून ३२ लाख ५३ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. यापूर्वी वानवडी पोलिसांनी अश्याच शिकलकरी टोळीला अटक करून एक कोटींचा माल जप्त केला होता.

रविसिंग शामसिंग कल्याणी (वय २२), बिंतुसिंग शामसिंग कल्याणी (वय २४), हुकमसिंग रामसिंग कल्याणी (वय २८ सर्व रा. हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
घरफोडी करणाऱ्या या शिकलकरी टोळीकडून चोरी करताना विशेष खबरदारी घेतली जात. त्यामुळे पोलिसांना ते सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशनमध्ये सापडत नव्हते. त्यामुळे शहरातील घरफोड्या करणारे चोरटे सापडत नव्हते. यामुळे घरफोड्याचे प्रमाण देखील वाढले होते. दरम्यान स्थानिक पोलीस व गुन्हे शाखेच्या पोलिसांना या टोळ्यांच्या मुसक्या आवळण्याचे सूचना दिल्या होत्या. परंतु पोलिसांना देखील या टोळ्या गुंगारा देत होत्या.

यावेळी वानवडी पोलिसांनी हडपसर परिसरातील शिकलकरी टोळीवर लक्ष ठेवले होते. संबंधित टोळी चोरी करीत असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पोलिसांनी कल्याणी टोळीला ताब्यात घेतले. काहीवेळ काहीच न सांगणाऱ्या या टोळीला पोलिसी खाक्या दाखवताच चौकशीत त्यांनी पुणे शहर, पिंपरी-चिंचवड परिसरात घरफोडी, वाहनचोरी मिळून १३ गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून 32 लाख 54 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

दरम्यान यापूर्वी वानवडी पोलिसांनी 2019 मध्ये एक टोळीला पकडून 1 कोटींचा माल जप्त केला होता. तर फेब्रुवारी 2020 मध्ये दुसऱ्या टोळीला पकडून 21 गुन्ह्यात 21 किलो चांदीसह 1 कोटींचा ऐवज जप्त केला आहे. पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक आयुक्त कल्याणराव विधाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, पोलीस निरीक्षक सलीम चाउस, सहायक पोलीस निरीक्षक आसाराम शेटे, राजू रासगे, आनंद पाटोळे, योगेश गायकवाड, संभाजी दिवेकर, नासिर देशमुख, नवनाथ खताळ, महेश कांबळे, अनुप सांगळे, अमित चिव्हे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.