पेट्रोल पंपावर दरोड्याच्या तयारीतील टोळी शस्त्रासह पुणे पोलिसांकडून जेरबंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आंबेगाव बु. येथील शहिद कर्नल पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला भारती विद्यापीठ पोलिसांनी शस्त्रासह अटक केली आहे. पोलिसांनी कुख्यात गुन्हेगार तौसिफ सय्यद याच्यासह पाच जणांना अटक केली आहे. ही कारवाई आंबेगाव येथील उत्कर्ष शाळेजवळील स्वरा बिल्डींगजवळ करण्यात आली.

तौसिफ उर्फ मोसिन जमीर सय्यद (वय-२४ रा. संतोषनगर कात्रज), चंद्रशेखऱ उर्फ शेखर विठोबा ठोंबरे (वय-२२ रा. कात्रज, मुळ रा. अक्कलकोट), रविंद्र दत्ता सुर्यवंशी (वय-२२ रा. जाधवनगर, वडगाव बु), रफिक मदार शेख (वय-२१ रा. धबाडी आंबेगाव), विकास सुभाष सावंत (वय-२३ रा. वडगाव मुळ रा. बीड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

कुख्यात गुन्हेगार तौसिफ सय्यद हा त्याच्या इतर साथीदारांह आंबेगाव येथील शाळेजवळील भींतीजवळ दबा धरून बसला आहे. त्याच्याबरोबर असलेले इतर साथीदार हे गंभीर गुन्ह्यातील आरोपी असल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे कर्मचारी सर्फराज देशमुख व राहुल तांबे यांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांना सापळा रचून पाच जणांना अटक केली. या कारवाईत पोलिसांनी ३ कोयते, मिरची पुड, पेट्रोल पंपाचा नकाशा असे साहित्य असा एकूण १५ हजार ७१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

आरोपी तौसिफ सय्यद हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी मार्केट यार्ड येथील पेट्रोल पंपाची ३५ लाख रुपयांची रक्कम दरोडा टाकून लुटल्याचा गुन्हा दाखल आहे. तर मागील पंधरा दिवसांपूर्वी खंडणीच्या स्वरूपात फ्लॅटची मागणी केल्याच्या गुन्ह्यामध्ये तो मुख्य आरोपी आहे. गुन्हा घडल्यापासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. तसेच शेखर ठोंबरे हा मागील आठवड्यात कात्रज चौकात तलवारीने रिक्षाच्या काचा फोडून दहशत निर्माण केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी आहे. तर शिरवळ येथील पत्रकाराला जीवे मारण्याचा प्रयत्न देखील त्याने केला होता.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग श्रीकांत तरवडे, परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त मालोजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुन्हे विष्णु ताम्हाणे, तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक सुबराव लाड, पोलीस कर्मचारी कृष्णा बढे, सर्फराज देशमुख, राहुल तांबे, सचिन पवार, कुंदन शिंदे, गणेश चिंचकर, अभिजीत रत्नपारखी, महेश मंडलीक, अभिजीत जाधव, योगेश सुळ यांच्या पथकाने केली.

आरोग्यविषयक वृत्त