फोनवर ऑर्डर घेऊन सिगारेटची विक्री करणारा गोत्यात, पोलिसांकडून 2 लाख 7 हजाराचा माल जप्त

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – लॉकडाऊनचा फायदा घेत दोन पानटपरी चालक फोनवर सिगारेटची ऑर्डर घेऊन त्याची विक्री करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांच्याकडून २ लाख ७ हजार रुपयांची सिगारेट जप्त करण्यात आली. लॉकडाऊनचा फायदा घेऊन शहरात जादा दराने अंमली पदार्थांची विक्री करण्यात येत आहे. खंडणी व अंमली पदार्थ विरोधी पथकाने पडकले आहे.

नसीम नुरमहमद शेख (वय ४२) आणि महमह इस्तेखार अब्दुल गफार शेख (वय २०, दोघेही रा. खराडी) असे जेरबंद करण्यात आलेल्यांची नावे आहेत. चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लॉकडाऊनमुळे शहरात सर्व आस्थापना बंद आहेत. अशाही परिस्थितीत फोनवर ऑर्डर घेऊन खराडीत छुप्या पद्धतीने अंमली पदार्थांची विक्री केली जात असल्याची माहिती कर्मचारी अमोल पिलाणे आणि संदीप साबळे यांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसाद मोकाशी, रमेश गरुड , प्रविण पडवळ यांनी खराडीत युवान आय. टी. पार्क येथील रॉयल पान शॉप दुकानात छापा टाकला.

त्यावेळी नसीम आणि महंमद फोनवर सिगारेटची ऑर्डर घेऊन विक्री करीत असल्याचे दिसून आले. त्यानुसार पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, खराडीत बहुतांश आयटी कंपनी कामगार आहेत. त्यांना सिगारेटची आवश्यकता होती. त्यानुसार ते दोघेही ओळखीच्या ग्राहकांना फोन करून ऑर्डर स्वीकारत होते. त्यानुसार दोघेही छुप्या पद्धतीने ग्राहकांना जादा दराने सिगारेटची विक्री करीत असल्याची कबुली त्यांनी दिली.

वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, अमोल पिलाने, संदीप साबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.