कॅनॉलमध्ये सापडले मांडूळ, विक्रीसाठी आलेल्याला पकडले…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – शहरालगत असणार्‍या कॅनॉलमध्ये सापडलेले मांडूळ विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला भारती विद्यापीठ पोलीसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून साडे तीन फुटाचे मांडूळ जप्त करण्यात आले आहे.

पांडुरंग विठोबा चव्हाण (वय 48, रा. कोथरूड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
शहरातील वाढत्या घरफोड्या, सोन साखळी तसेच लुटमारीच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी गुन्हे शाखेसह स्थानिक पोलिसांना गस्त घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, भारती विद्यापीठ पोलीसांचे पथक हद्दीत गस्त घालत होते. यावेळी कर्मचारी हर्षल शिंदे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एकजन मांडूळ विक्री करण्यासाठी गुजरवाडी परिसरात येणार आहे. त्यानुसार, वरिष्ठ निरीक्षक वसंत कुंवर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महेंद्र पाटील, कर्मचारी हर्षल शिंदे, प्रणव संकपाळ व त्यांच्या पथकाने याठिकाणी सापळा रचला. बातमीदाराने सांगितलेल्या वर्णणानुसार व्यक्ती आल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळील पिशवीत साडे तीन फुटाचे एक मांडूळ मिळून आले. याबाबत चौकशी केल्यानंतर त्याला हे मांडूळ कॅनॉलमध्ये मिळाले असल्याचे समजले. तो मांडूळ कोणाला विक्री करणार होता. याचा तपास करण्यात येत आहे.

फेसबुक पेज लाईक करा –