समाज कल्याण आयुक्तालयासमोर कर्णबधीर आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यातील समाजकल्याण आयुक्तालयासमोर आंदोलन करणार्या कर्णबधीर आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा प्रकार दुपारी दोन ते अडीचच्या सुमारास घडला. कर्णबधीरांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी महाराष्ट्रभरातून आंदोलक जमले होते. सरकारचे लक्ष आपल्या मागण्यांकडे वेधून घेण्यासाठी त्यांनी मागण्या पुर्ण न झाल्यास मुंबईपर्यंत पायी जाण्याचा निर्धार केला होता.

शिक्षण आणि नोकरीच्या वेळी येणाऱ्या अडचणींच्या संदर्भातील वेगवेगळ्या मागण्यांसाठी राज्यभरातून तीन ते चार हजार कर्णबधीर पुण्यात आले आहेत. पुण्यातील समाज कल्याण आयुक्तालयासमोर सोमवारी सकाळपासून आंदोलन करत होते. समाज कल्याण आयुक्तांकडून त्यांच्या मागण्या पुर्ण झाल्या नाही तर मुंबईपर्यंत पायी चालत जाण्य़ाचा निर्धार त्यांनी केला होता. पोलिसांनी तेथे बंदोबस्त तैनात केला होता. त्यांच्या मुंबईपर्यंत चालत जाण्याला पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यानंतर दुपारी साडेतीनच्या सुमारास पोलिसांनी जमावावर लाठीमार केला. त्यासोबतच त्यांची धरपकड सुरु केली. काही काळ समाज कल्याण आयुक्तालयासमोर चांगलीच धांदल उडाली होती. यात अनेक आंदोलनकर्ते जखमी झाले आहेत. या सर्व प्रकारानंतर काही आंदोलक तेथे ठाण मांडून बसले आहेत.

तीन ते चार हजार आंदोलक या ठिकाणी जमलेले आहेत. त्यांना ऐकू येत नाही. त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला परंतु आमचं त्यांना काही समजत नाही. त्यामुळे काही जणांनी कायदा मोडण्याचा प्रयत्न केला. त्यांना पुढे जाण्यास मज्जाव केलेला असतानाही ते पुढे जाऊ लागल्याने लाठीमार करावा लागला. असे बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम. एम. मुजावर यांनी दिली.

या सर्व प्रकारानंतर आंदोलक आपल्या मागण्यांवर आणि आंदोलन करण्यावर ठाम आहेत. पुण्यात यापूर्वीही आंदोलन केले. तसेच मुंबई, नागपूरमध्येही आंदोलन केले. मात्र त्या मागण्या पुर्ण होत नाहीत. त्यामुळे आमच्या मागण्यावर आम्ही ठाम आहोत. त्यामुळे आमचे आंदोलन सुरुच राहणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले.