2 कोटींच्या खंडणीसाठी पुण्यातील लक्ष्मी रोडवरील व्यापाऱ्याचा गोळ्या झाडून खून केल्याप्रकरणी एकजण ताब्यात, ‘गूढ’ उकललं ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – 2 कोटींच्या खंडणीसाठी लक्ष्मी रस्त्यावरील फुटवेअरचे व्यापारी चंदन कृपालदास शेवाणी (वय 48) यांच्या खूनाचा उलघडा करण्यात सातारा पोलिसांना यश आले आहे. त्यांनी यातील एकाला ताब्यात घेतले आहे.

आफ्रिदी खान (वय 27, पुणे) असे ताब्यात घेण्यात आलेल्याचे नाव आहे. चंदन शेवाणी यांचे लक्ष्मी रस्त्यावर फुटवेअरचे दुकान आहे. दरम्यान, शनिवारी (दि. 4 जानेवारी) रात्री ते त्यांची कार घेऊन कुटूंबियांना एकाच्या घरी जात असल्याचे त्यांनी सांगितले होते. परंतु, 12 वाजेपर्यंत घरी न परतल्याने त्यांच्या कुटूंबियांनी बंडगार्डन पोलीसांकडे तक्रार केली. याप्रकरणी मिसींग दाखल करण्यात आली होती. मात्र, दुसर्‍याच दिवशी म्हणजे, रविवारी दुपारी चंदन शेवाणी यांचा सातारा जिल्ह्यातील पाडेगावात तीक्ष्ण हत्याराने तसेच गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आले. यानंतर पुण्यात एकच खळबळ उडाली होती. त्यांच्या मृतदेहाजवळ 2 कोटींच्या खंडणीसाठी त्यांचा खून केल्याचे समोर आले होते.
Murder
पुणे पोलिसांचीही यामुळे भंबेरी उडाली आणि पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. त्यानंतर गुन्हे शाखा तसेच स्थानिक पोलिसांकडून पुर्ण माहिती घेण्यास सुरुवात केली. त्यानुसार पुणे पोलीसांची गुन्हे शाखा अन् परिमंडळ दोनचे सर्वच पोलीस ठाण्यातील डीबींचे पथक बंडगार्डन पोलीस ठाण्यात ठाण मांडून या गुन्ह्याचा छडा लावण्याचा प्रयत्न करत होते.

दरम्यान, सातारा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने 24 तासाच्या आत या गुन्ह्याचा छडा लावत पुण्यातीलच एकाला ताब्यात घेतले आहे. त्याने गुन्ह्याची कबूली दिली असून, त्याच्या इतर साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. यातील आरोपींचे नावे निष्पन्न झाली आहेत. त्यांचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात येते. खंडणीसाठीच खून केल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले आहे. सातारा पोलिसांनी 24 तासात पुण्यातील आरोपीला पकडल्यानंतर पुणे पोलिसांचे पथक त्याला ताब्यात घेण्यासाठी रवाणा झाले आहे.

तीन गोळ्या झाडल्या…
रविवारी संध्याकाळी शेवानी यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाले. त्यावेळी त्यांच्यावर धारधार हत्याराने वार करून 3 गोळ्या झाडल्याचे दिसून आले आहे. त्यांच्या डोक्यात आणि चेहर्‍यावर वार केले. छातीत, मानेत आणि पोटात गोळ्या मारण्यात आल्याचे समोर आले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/