पुण्यातील ‘तो’ पोलिस कर्मचारी खात्यातून बडतर्फ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सीबीआयचा (केंद्रीय अन्वेषण विभाग) सीबीआय) अधिकारी असल्याचे सांगत फसविणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यास पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यात आले आहे. पोलिस खात्याची प्रतिमा मलीन केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.

संतोष भगवान साळुंखे असे बडतर्फ केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. बडतर्फीचे आदेश अतिरिक्त आयुक्त अशोक मोराळे यांनी दिले आहेत.

बॉम्ब शोधक व नाशक पथक (बीडीडीएस) येथे साळुंखे २०१३ मध्ये नेमणुकीला होता. त्यावेळी त्याची नेमणूक पोलिस आयुक्त कार्यालयातील गेट क्रमांक तीन येथे करण्यात आली होती. मात्र, तो गुलटेकडी येथील साहेबराव कयानी यांच्या निवासस्थानी गेला. तसेच सीबीआयचा मी अधिकारी असल्याची बतावणी केली. त्या ठिकाणी हवाला रॅकेट चालत असल्याचे सांगत छापा टाकण्याचा बनाव केला. त्यावेळी यातील तक्रारदार यांनी ओळखपत्र व वॉरन्टची विचारणा केली. त्यावेळी त्यानी दुरूनच ओळखपत्र दाखविले होते. हा प्रकार समोर आल्यानंतर स्वारगेट पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच, साळुंखे याला निलंबित केले होते. या प्रकरणी हडपसर विभागाचे सहायक पोलिस आयुक्त यांना विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

हडपसर विभागाच्या सहायक आयुक्तांनी या प्रकरणी सर्व चौकशी केली. तसेच, साळुंखे याला त्याची बाजू मांडण्याची संधी देण्यात आली. पण, या चौकशीत साळुंखे याच्यावर ठेवलेले आरोप सिध्द होत असल्याचे दिसून येत असल्याचा अहवाल दिला होता. साळुंखे याने पदाचा दुरूपयोग करून स्वतः च्या लाभासाठी वापर केला. बेजाबादार पणे वागून गुन्हेगारी कृत्य केल्याचे चौकशीत दिसून आले आहे. त्याच्यामुळे खात्याची प्रतिमा मलीन झाली आहे. असा ठपका ठेवत साळुंखे याला पोलिस खात्यामधून काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत.

आता साळुंखे याला या आदेशाच्या विरोधात गृह विभागाच्या मुख्य सचिवांकडे 8 दिवसात अपील करण्यास मुदत दिल्याचे आदेशात म्हटले आहे.