Pune : गुंडाच्या अंत्ययात्रेचा Video व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलिसांना आली जाग; 15 पोलीस पथकांनी केली 80 जणांची धरपकड, दुचाकीही केल्या जप्त

पुणे : भारती विद्यापीठ, सहकारनगर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुंडाचा बिबवेवाडीत निर्घुण खुन झाला. दुसर्‍या दिवशी त्याची धनकवडी ते कात्रज स्मशानभूमी अशी अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यात २००हून अधिक जण सहभागी झाले होते. या अंत्ययात्रेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी पुणे पोलिसांना जाग आली़ त्यांनी दिवसभरात ८० जणांची धरपकड केली आहे.

गँगस्टर गजानन मारणे याची तळोजा तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्याने मुंबई ते पुणे महामार्गावर ३०० वाहनांसह मोठी मिरवणुक काढली होती. याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलिसांसह पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण पोलिसांना जाग आली होती. असाच काहीसा प्रकार धनकवडीत शनिवार, रविवारी दिसून आला.

सराईत गुन्हेगार माधव वाघाटे याचा सागर गवळी, गोपाळ ढावरे, सुनील घाटे, पवन गवळी यांच्यासह १० जणांनी शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजता बिबवेवाडी पोलीस चौकीच्या समोर निर्घुण खुन केला होता. शवविच्छेदनानंतर त्याचे पार्थिव धनकवडीमधील त्याच्या घरी आणण्यात आले. शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास धनकवडीमधून कात्रज स्मशानभूमीदरम्यान एका अम्बुलन्समधून हे पार्थिव नेण्यात येत होते. त्याच्या पाठोपाठ शेकडो दुचाकी, कार, रिक्षांमधून २०० हून अधिक जण या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते.

या अंत्ययात्रेचा व्हिडिओ शनिवारी सायंकाळी सोशल मिडियावर व्हायरल झाला. यानंतर पोलिसांना जाग आली. सहकारनगर पोलिसांनी कोविड १९ चे नियमभंग केल्याबद्दल २०० जणांवर शनिवारी रात्री ८ वाजता गुन्हा दाखल केला.

रविवारी या अंत्ययात्रेचा व्हिडिओ आणि पोलिसांनी वेळीच काहीही कारवाई न केल्याच्या बातम्या सर्वत्र प्रसारित झाल्या. त्यानंतर पोलिसांनी उचल खाल्ली. रविवारी दुपारपासून पुणे पोलिसांच्या १५ पथकांकडून या व्हिडिओची पडताळणी सुरु झाली. त्यातील तरुणांना पाहून धरपकड सुरु करण्यात आली. रात्रीपर्यंत तब्बल ८० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तसेच या अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या सुमारे ४० दुचाकीही पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.