तब्बल 40 गुन्हे दाखल असलेला कुख्यात सराईत गुन्हेगार जेरबंद; पुणे ग्रामीणने लातूरहून दोघांना केली अटक

ADV

पुणे : पुणे जिल्ह्यात जबरी चोरीचे गुन्हे करणार्‍या व मराठवाड्यात तब्बल ४० गुन्हे दाखल असलेल्या कुख्यात सराईत गुन्हेगारासह दोघांना पुणे ग्रामीण पोलिसांनी लातूरहून अटक केली आहे.

ज्ञानेश्वर ऊर्फ सैराट बालाजी जाधव (वय ३०, रा. रेणापूर, रुपचंदनगर तांडा, ता. रेणापूर, जि. लातूर) आणि अर्जुन ऊर्फ अजय बालाजी जाधव (वय १९, रा. औसा हनुमान, लातूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

हेमंत करे (रा. पंढरपूर) हे व त्यांचे मित्र मोटारसायकलवरुन२७ मार्च रोजी मध्यरात्री पंढरपूर टेंभुर्णी मार्गे पुण्याकडे येत होते. मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास सोलापूर रोडवरील रावणगाव येथे दोघा चोरट्यांनी बुलेट आडवी घालून करे यांना थांबण्यास भाग पाडले. त्यांच्या मोटारसायकलची चावी घेतली. दोघांकडील मोबाईल, बॅग, रोकड असा ६८ हजार ८०० रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना पुणे ग्रामीण पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली. त्यावरुन पोलिसांनी लातूरला सापळा रचून दोघांना पकडले.

ज्ञानेश्वर जाधव यांच्याकडील बुलेट हवेली तालुक्यातील थेऊर फाटा येथून चोरली आहे. तसेच दौंडचे जबरी चोरी गुन्ह्यात वापरलेली स्प्लेंडर मोटारसायकल अशा २ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

ज्ञानेश्वर जाधव हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी ३८ गुन्हे दाखल आहेत. त्यात अहमदपूर पोलीस ठाणे, रेणापूर, लातूर एमआयडीसी, शिवाजीनगर, गांधी चौक पोलीस ठाणे, औसा, अंबाजोगाई, बीड शहर, माझलगाव, शिवाजीनगर (बीड), मुतखेड, उमरी, लोहा, परभणी या पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध चोरीचे गुन्हे दाखल आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्याकर घनवट, सहायक निरीक्षक सचिन काळे, हवालदार महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, सुभाष राऊत, काशिनाथ राजापूरे, गुरु गायकवाड यांनी ही कामगिरी केली़