धक्कादायक ! पुण्यात ‘फालुद्यात’ सापडले ‘ब्लेड’

पुणे (पिंपरी) : पोलीसनामा ऑनलाईन – आईस्क्रीम विक्रीच्या गाडीवरून घेतलेला फालुदा खाताना त्यामध्ये ब्लेड आढळले. याप्रकरणी आईस्क्रीम विक्रेत्याकडे विचारणा केली असता त्याने ग्राहकासोबत हुज्जत घातली. याप्रकरणी संगणक अभियंत्याने सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आईस्क्रीम विक्रेत्याला अटक केली आहे. मनोज सुरेश आहुजा यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मनोज आणि त्यांच्या पत्नीने पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉनसमोरील रस्त्याच्या बाजूला रतन गाडरी यांच्या आईस्क्रीमच्या गाडीवरून फालुदा विकत घेतला. फालुदा खात असताना त्यांच्या तोंडात काही तरी धारदार वस्तू लागली. त्यांनी ती वस्तू तोंडातून बाहेर काढली असता ती ब्लेड असल्याचे त्यांच्या लक्षात आले. सुदैवाने त्यांच्या तोंडात कोणतीही दुखापत झाली नाही.

फालुद्यामध्ये ब्लेड निघाल्यानंतर त्यांनी रतन गाडरी यांना सांगितले. त्याने याची दखल न घेता त्यांच्यासोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर आहुजा यांनी सांगवी पोलीस ठाण्यात धाव घेत रतन गाडरी याच्याविरोधात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी फालुदा विक्रेत्याला अटक केली असून त्याची जातमुतलक्यावर सुटका करण्यात आली आहे.

You might also like