Pune : हडपसरमध्ये कडक विकेंड Lockdown मुळे दुसऱ्या दिवशी ‘सन्नाटा’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विकेंडला शनिवार-रविवार कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी केल्यामुळे मद्यपी आणि सामिष खवय्यांची काहीशी अडचण झाली. मात्र, कोरोनाला हरवायचे असेल तर काही गोष्टींवर स्वतःच बंधने घातली पाहिजेत, अशी टिपण्णी अभ्यासकांनी दिली. सलग दुसऱ्या दिवशी हडपसर परिसरातील सर्व दुकाने आणि मुख्य बाजारपेठ बंद होती. त्यामुळे सर्व दुकानांचे शटर बंद आणि रस्त्यावर शुकशुकाट दिसत होता.

शासनाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे सकाळी 6 ते 11 पर्यंत दूध-अंडी विक्री वगळता सर्व व्यवहार बंद होते. रविवार सुटीचा दिवस मानून बहुतेक मंडळींनी घरात थांबणे पसंत केले. रुग्णांचे नातेवाईक आणि औषधे खऱेदी करणारा वर्ग मेडिकलमध्ये ये-जा करीत असताना दिसत होता. हॉस्पिटलपर्यंत रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिका धावत होत्या. रविवार असल्यामुळे खासगी हॉस्पिटलमध्येही नागरिकांची वर्दळ कमी होती.
मागिल दोन दिवसांपासून कडक लॉकडाऊन सुरू आहे.

त्यातच उद्यापासून पु्न्हा लॉकडाऊन होणार की काय अशी विचारणा नागरिकांकडून केली जात आहे. कोरोनाचा आकडा वाढत आहे, त्यामुळे नागरिकांची भयग्रस्त स्थिती झाली आहे. लॉकडाऊन झाले, तर गावाकडे जाता येणार का, अशी विचारणा राज्य-परराज्यातील नागरिक करू लागले आहेत. आता लॉकडाऊन लागले, तर गावाकडेच जावे लागणार आहे. आता बांधकाम, हॉटेल्स, कंपन्या, उद्योगधंदे कधी सुरू होतील, याची खात्री नसल्याने कामगारवर्ग द्विधा मनस्थितीत सापडला आहे.

हडपसर उड्डाण पुलाखाली गांधी चौकात दररोज हजार-दीड हजार मजूर रोजगारासाठी थांबतात. मात्र, लॉकडाऊनमुळे एकही मजूर फिरकला नाही. त्यामुळे मजूर अड्डा सुनासुना दिसत होता. खादी-पांढऱ्या वर्दीतील पोलीस अधिकारी-कर्मचारी बंदोबस्तावर होते. त्यामुळे अनेक वाहनचालक पुढे जाऊ का, यू टर्न घेऊ का, प्रीस्क्रीपशन दाखवत औषधे आणायला चाललो आहे, असे चित्र आज हडपसर गांधी चौकातील उड्डाण पुलाखाली दिसत होते.