Pune : 1 मे पासून सुरु होणाऱ्या लसीकरणाची वेळेत उपाययोजना करा, पुणे मनपा विरोधी पक्षनेत्यांची मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   देशात कोरोनाचा वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 18 वर्षापुढील सर्व व्यक्तींना 1 मे पासून लसीकरण करण्याची परवानगी दिली आहे. पुणे शहरात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला असून दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने परिस्थिती अत्यंत गंभीर होत चालली आहे. पुणे शहरात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरु आहे. मात्र, पुण्यातील लसीकरण मोहिम पुर्णपणे अपयशी ठरली असल्याचा आरोप पुणे महानगर पालिकेतील विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी केला आहे.

पुण्यात नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रुग्णांना वेळेवर बेड उपलब्ध होत नाहीत. रेमडेसिवीरचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. लसीकरण केंद्रावर नागरिकांच्या रांगा लागत आहे. 4-5 तास थांबले तरी लस मिळत नाही. ज्येष्ठ नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच केंद्र सरकारने नुकतेच 18 वर्षावरील नागरिकांना लस देण्याची मोहिम 1 मे पासून सुरु केली आहे. मात्र, पुणे शहरात लसीकरणा मध्ये अनेक त्रुटी असून या त्रुटी लवकरात लवकर दूर कराव्यात अशी मागणी दिपाली धुमाळ यांनी पुणे महापालिका आयुक्तांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

दिपाली धुमाळ यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुणे शहरात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेत अनेक त्रुटी आहेत. त्यातच 1 मे पासून 18 वर्षावरील व्यक्तींना लसीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे लसीकरणाबाबत उपाययोजना वेळेत करणे आवश्यक आहे. त्यासाठी लागणारा लसींचा साठा उपलब्ध करणे आवश्यक आहे. लसीकरणासाठी लसीकरण केंद्र उभारावे लागतील. नवीन केंद्र सुरु करताना आवश्क स्टाफ व सामग्री लागणार आहे. याची पुर्तता देखील करावी लागणार आहे. तसेच आवश्यक स्टाफ यामध्ये नर्सेस, डॉक्टर्स, परिारीका व गार्डस यांची नेमणूक करावी लागणार आहे. आवश्यकता भासल्यास भरती करावी. या सर्व उपाययोजना वेळेत कराव्यात. जेणेकरुन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल आणि नागरिकांची होणारी हेळसांड थांबेल, असे निवेदनात दिपाली धुमाळ यांनी म्हटले आहे.