Pune : कोरोनाचा संसर्ग होण्याच्या भितीपायी मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी प्रौढ लसीकरणाच्या संख्येत घट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी नियमित प्रौढ लसीकरणाच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. यंदाच्या वर्षाची सुरूवात ‘कोविड-१९’ या आजाराच्या प्रसाराने झाली. कोरोना रूग्णांमध्ये आढळून येणारी लक्षणं ही श्वसनासंदर्भातील अनेक सामान्य आजारांमध्येही दिसून येत आहेत. कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्याच्या भितीपायी नागरिक घरातून बाहेर पडत नव्हते. त्यामुळे लसीकरणाच्या संख्येत कमी झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

कुठल्याही संसर्गजन्य आजाराची लागण होऊ नये, यासाठी लसीकरण करून घेणं हा एक प्रभावी उपाय आहे. ही लस कुटुंबातील प्रत्येक सदस्य घेऊ शकतात. शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी लसीकरण करून घेणं अतिशय फायदेशीर आहे. त्यामुळे साथीचे आजार होण्यापासून टाळण्यासाठी प्रत्येक वयोगटातील लोकांनी तातडीने लसीकरण करून घेणं ही काळाची गरज आहे. लसीकरणामुळे आजारांचा प्रसार होण्यापासून रोखता येऊ शकतो.

पुण्यातील अपोलो हेल्थ अँण्ड लाइफस्टाइल लिमिडेटचे वैद्यकीय संचालक डॉ. अजय गंगोली म्हणाले की, ‘‘संपूर्ण जग सध्या कोरोना व्हायरस या घातक विषाणूशी लढत आहेत. अशा स्थितीत दरवर्षीप्रमाणे यंदाही डेंग्यू, मलेरिया, टाइफाइड, फ्लू यांसारख्या संसर्गजन्य आजारांचा धोका संभवू शकतो. लहान मुलं, गर्भवती महिला आणि वयोवृद्धांना हा आजार होण्याचा भिती अधिक असते. त्यामुळे संसर्गजन्य आजार टाळण्यासाठी दरवर्षी नियमितपणे लसीकरण करून घेणं आवश्यक आहे. यासाठी प्रत्येकाने स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. याकरता चेहऱ्यावर मास्क लावणे, वारंवार हात स्वच्छ धुवणे आणि सामाजिक अंतर पाळले पाहिजे’’

डॉ. अजय गंगोली पुढे म्हणाले की, ‘‘सामान्यतः जन्मानंतर बाळाला लस टोचली जाते. पण आता एखाद्या व्यक्तीला अन्य देशात जाण्यापूर्वी लसीकरण करून घेणं बंधनकारक आहे. याशिवाय प्रत्येक व्यक्तीचे वयानुसार ठरलेल्या मापदंडानुसार लसीकरण केले जाते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लसीकरण करण घेतले पाहिजे.’’

‘‘या लसीचा प्रभाव आणि परिणाम प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळा असतो. लसीकरण करून घेण्यासाठी इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) च्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणाऱ्या रूग्णालयाची निवड करा”, असेही डॉ अजय गंगोली म्हणाले.

यावर्षी आपण सर्वांनी आपले आरोग्य आणि आपल्या कुटुंबाला प्राधान्य दिले पाहिजे, जेणेकरुन येणारी वर्षे आमच्यासाठी अधिक चांगली जातील.