पुणे : रोडरोमियोच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थीनीची आत्महत्या

बारामती : पोलीसनामा ऑनलाईन

बारामती तालुक्यातील झारगडवाडी  येथील कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थीनीने रोडरोमिओच्या त्रासाला कंटाळुन विषप्राशन करुन आत्महत्या केली. आकांक्षा प्रदीप दरेकर (वय १६) असे या आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.आकांक्षा हिने ११ ऑगस्ट रोजी विषारी औषध प्राशन के ले होते. तेव्हापासुन तिची मृत्युशी झुंज सुरु होती. अखेर आज (बुधवारी) सकाळी बारामती येथील खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचारादरम्यान तिचा मृत्यु झाला.

आकांक्षा ही येथील कनिष्ठ महाविद्यालयात ११ वी मध्ये शिक्षण घेत होती. याबाबत तिचा चुलत भाऊ सुरज दरेकर याने बारामती ग्रामीण पोलिसांना फिर्याद दिली आहे. त्यामुळे पोलिसांकडूनगुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आकांक्षा हिने याबाबत कुटुंबियांना सांगितले होते. झारगडवाडी येथील महेश मासाळ हा आकांक्षा शाळेत जात असताना पाठीमागे येत असत. तसेच तो तिची छेडछाड देखील करत  होता. त्यामुळे तिने त्याच्या त्रासाला कंटाळुन घरात जनावरांसाठी आणलेले गोचिडाचे औषध पित आत्महत्या केली आहे. पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे सांगितले.

कॉलेज परिसरात वावरणाऱ्या रोडरोमियोंवर कारवाई करण्याची मागणी होत असताना देखील पोलिसांकडून कोणतीच कारवाई करण्यात आली नसल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी यापूर्वी देखील रोडरोमियोंवर कारवाई केली होती. मात्र, कारवाई नंतर पुन्हा रोडरोमियोंनि उच्छाद मांडला आहे. त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.