Pune : जम्बो हॉस्पीटलमधील कोरोना बाधितांना नातेवाईकांकडूनच तंबाखू, गुटख्याची मात्रा; महापालिका प्रशासन आणि डॉक्टरांनी हात टेकले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   शासकिय अथवा महापालिकेसारख्या शासकिय सेवेत त्रुटी राहील्यावरून या संस्था कायमच टीकेच्यास्थानी असतात. परंतू या संस्थांनी कितीही चांगल्या सेवा, सुविधा पुरविल्या तरी त्याची नासधूस आणि घाण करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान व विद्रुपीकरण करणारी मंडळीही काही कमी नाहीत. मग ती कोव्हीड हॉस्पीटलसारखी मोफत सुविधा का असेना, तेथेही नातेवाईक रुग्णांना तंबाखू, गुटख्याच्या पुड्या पुरवत असून तेथे शेकडो रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर्स आणि यंत्रणेचे मानसिक खच्चीकरण करत असल्याचा दुर्देवी प्रकार घडत आहे.

शिवाजीनगर येथील सीओईपी जंबो कोव्हिड हॉस्पीटलमध्ये प्रवेशद्वारावरील कडक तपासणी दरम्यान आज हा प्रकार उघडकीस आला. जंबो कोव्हिड सेंटरमध्ये सध्या ६५० हून अधिक कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. याठिकाणी रुग्णांना अगदी जेवणापासून अत्यावश्यक सुविधा महापालिकेच्यावतीने पुरविण्यात येत आहेत. परंतु काही रुग्णांना त्यांच्या घरून येणारे अन्न पदार्थ, फळेही देण्याची सुविधा देण्यात आली आहे. मात्र, या सुविधेचा गैरवापर रुग्ण आणि नातेवाईकांकडूनही होत असल्याची धक्कादायक बाब आज तपासणी दरम्यान उघडकीस आली आहे.

हॉस्पीटलच्या प्रवेशद्वारावर नातेवाईकांकडून देण्यात येणार्‍या डब्यांची तपासणी केल्यावर चक्क ड्रायफ्रुटच्या डब्यांमध्ये बंदी असलेल्या गुटख्याच्या पुड्या आढळून आल्या. तपासणीत सुरक्षा रक्षकांच्या हाती लागू नये म्हणून कापडी पिशव्यांमध्ये कापडांची खोळ करुन त्यात तंबाखू, चुन्याची पुडी ठेवून त्या खोळही पुन्हा शिवण्याची कल्पकता दाखविण्यात आली. बहुतांश रुग्णांना घरून येणार्‍या डब्यांमध्ये तंबाखू व गुटख्याच्या पुड्याच हाती लागल्याने प्रशासकीय यंत्रणेतील अधिकार्‍यांनीही डोक्याला हात लावला आहे. तर येथे रुग्ण बरा व्हावा यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार्‍या डॉक्टरही चक्रावून गेले आहेत.

मागीलवर्षी शहरात ठिकठिकाणी विलगीकरण केंद्र सुरू करण्यात आली होती. त्यावेळी देखिल असे प्रकार सातत्याने उघडकीस येत होते. परंतू जंबो हॉस्पीटलसारख्या ठिकाणी शक्यता ऑक्सीजन व व्हेंटीलेटरची गरज असलेलेच जवळपास सर्वच रुग्ण असताना त्यांनाही तंबाखू, गुटख्याच्या पुड्या नातेवाईकांकडूनच देण्यात येत असतील तर आम्ही नेमके काय करावे? अशी अगतिकता आता डॉक्टर मंडळी उपस्थित करू लागली आहे.