Savitribai Phule Pune University : शिष्यवृत्तीच्या रकमेत केली 50 % कपात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्तीच्या रकमेत 50 टक्के कपात केली आहे. तसेच विद्यार्थी उच्च शिक्षण घेत असताना Maha DBT मार्फतही शिष्यवृत्ती मिळते. ज्यांनी Maha DBT फॉर्म भरला आहे, त्यांना राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार नाही, अशी जाचक अटक विद्यापीठाने घातली आहे.

गेल्या वर्षी अव्यावसायिक पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या 1200 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 12 हजार तर पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ही रक्कम प्रत्येकी 18 हजार अशी एकूण 800 विद्यार्थ्यांना छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती दिली होती. यंदा विद्यापीठाने छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्तीची रक्कम ही पदवीसाठी प्रत्येकी 6 हजार ठेवली असून ती 470 विद्यार्थ्यांना तर पदव्युत्तरसाठी ही रक्कम 8000 रुपये ठेवली असून ती 300 विद्यार्थ्यांना दिली जाणार असल्याचे परिपत्रकात म्हटले आहे. तसेच ज्यांनी Maha DBT फॉर्म भरला आहे. त्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार नाही, अशी जाचक अट घातली आहे. दरम्यान Maha DBT फॉर्म भरलेल्यांना ही शिष्यवृत्ती मिळणार नाही, ही घातलेली अट विद्यापीठाने तात्काळ मागे घेऊन शिष्यवृत्ती पूर्ववत ठेवावी अन्यथा विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटना रस्त्यावर उतरतील असा इशारा युक्रांदचे शहर उपाध्यक्ष कमलाकर शेटे यांनी दिला आहे.