WhatsApp मधून काढल्याचा जाब विचारण्यास गेलेल्यांना बेदम मारहाण, महिलेचा विनयभंग

पुणे,पोलीसनामा ऑनलाइन – नात्यांमधील व्यक्तींनी काढलेल्या एका व्हॉट्सअप ग्रुपमधून काढण्यास सांगितल्याने त्याबाबत जाब विचारण्यास गेलेल्या कुटूंबाला मारहाण करत एका महिलेचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी बाप-लेकाला अटक केली आहे.

गजानन दगडू मगर (वय 60) व मुलगा अजित गजानन मगर (वय 35, रा. मगरपट्टा सिटी) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. तर, एकजन पसार झाला आहे. याप्रकरणी 25 वर्षीय पिडीत महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मारहाण, विनयभंग यासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत महिलेचे कुटूंबिय आणि आरोपी एकाच परिसरात राहण्यास आहेत. तसेच, एकमेकांचे नातेवाईक देखील आहेत. त्यांचा नातेवाईक असणारा एक व्हॉट्सग्रुप आहे. त्यात पिडीत महिला व तिची कुटूंबिय देखील या ग्रुपमधील सदस्य होते. परंतु, आरोपींनी त्यांना या ग्रुपमधून काढण्यास सांगितले. त्यामुळे त्यांना या ग्रुपमधून काढण्यात आले. याचा जाब विचारण्यास पिडीत महिला, तिचा पती आणि सासू-सासरे आरोपींच्या घरी गेले. त्यावेळी त्यांना जाब विचारला. मात्र, याचा राग आल्याने आरोपींनी पती व सासू-सासर्‍यांना मारहाण केली. त्यानंतर फिर्यादी पिडीत महिलेचा विनयभंग केला. त्यांनी तत्काळ पोलिसांकडे धाव घेऊन घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तसेच, दोघा बाप-लेकांना अटक केली. तर, एकजन फरार आहे. अधिक तपास सहायक निरीक्षक गायकवाड हे करत आहेत.