PMP च्या धडकेत पुण्यात मामाकडे शिकण्यासाठी आलेल्या 14 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात मामाकडे शिकण्यासाठी आलेल्या 14 वर्षाच्या मुलाचा पीएमपी बसच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. अजय नामदेव राठोड (वय-14 रा. फुरसुंगी ता. हवेली मुळ. रा. परभणी) मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. अजय राठोड हा परभणीवरुन पुण्यात मामाकडे शिकण्यासाठी आला होता. ही घटना सोलापूर रोडवरील शेवाळवाडी फाटा येथे घडली. हा अपघात इतका भयानक होता की, यामध्ये मुलाच्या डोक्यावरून पीएमपीचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

याप्रकरणी त्याचा मामा अनिल आडे (रा. फुरसुंगी ) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हडपसर पोलिसांनी पीएमपी चालक मेहमुब अकबर सैय्यद (वय-38 रा. वडगाव-रसाई ता. हवेली) याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय हा बेकराईनगर येथील शाळेत इयत्ता सातवीत शिकत होता. मंगळवारी (दि.31) अजय हा मामा अनिलच्या दुचाकीवरून लोणी कडून हडपसरच्या दिशेने येत असताना सोलापूर रस्त्यावरील शेवाळवाडी फाट्याच्या पुढे त्यांच्या दुचाकीला पीएमपीची धडक बसली.

बसच्या धडकेत अजय गाडीवरून रस्त्याच्या उजव्या बाजूला खाली पडला. त्याच्या डोक्यावरुन पीएमपीचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीवर प्रवास करत असताना दोघांनीही हेल्मेट घातले नव्हते. गुन्ह्याचा तपास हडपसर पोलिस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षक वर्षा बांबे हे करीत आहेत.

पोलीसनामा फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/