Pune : मगर रुग्णालयात लसीकरणासाठी लोटली तरुणाई; नियोजनाअभावी प्रचंड गोंधळ, ज्येष्ठ नागरिक प्रचंड त्रासले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनावर संशोधित केलेली लस अठरा वयोगटापुढील सर्वांना देण्याचे नियोजन आहे. शासनाने संकेतस्थळ जाहीर केले आहे, त्यावर तरुणाईने नोंदणी केली, त्यानंतर त्यांना वेळ आणि ठिकाण देण्यात आले. त्याप्रमाणे हडपसरमधील (मगरपट्टा चौक) महापालिकेच्या खासदार स्व. अण्णासाहेब मगर रुग्णालयामध्ये लस घेण्यासाठी तरुणाईसह ज्येष्ठ नागरिकांनी गर्दी केली होती. मात्र, येथे कोणतेही नियोजन केले नसल्याने नागरिकांचा पुरता गोंधळ उडाला. मागिल महिन्यामध्ये नोंदणी केलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी पहाटेपासून रांगा लावल्या होत्या. मात्र, लस मिळणार नाही, असे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

मगर रुग्णालयामध्ये डॉक्टर आणि प्रशासकीय यंत्रणेकडून नियोजन केले जात नसल्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांनी सांगितले. मागिल आठवड्यापूर्वी लस घेण्यासाठी नाव नोंदणी केली आहे. मात्र, चार-पाच दिवस लसीकरण बंद असल्याने दोन वेळा येऊन परत गेलो. आज लस घेण्यासाठी आलो, तर नवीन नियम सांगितला जात आहे. आता आम्ही वृद्ध मंडळींनी लस कशी घ्यायची, येथील डॉक्टर सहकार्य करत नाहीत. मागिल दीड महिन्यापू्र्वी लस घेतली आहे, त्याची आमच्याकडे नोंद नाही, फक्त तारीख आहे, तर डॉक्टर विचारतात तुम्ही कुठली लस घेतली, कोशिल्ड की कोव्हॅक्सिन. आम्हाला त्यावेळी काहीही सांगितले नाही. आता आम्ही त्यांना कसे सांगायचे असा प्रश्न पडल्याचे नागरिकांनी स्पष्ट केले.

कोरोना महामारीचे संकट दिवसेंदिवस गडद होत आहे. कोरोनाबाधितांच्या तुलनेत रुग्णालये कमी पडू लागल्यामुळे उपचारासाठी अनंत यातना सहन कराव्या लागत आहेत. हॉस्पिटलमध्ये बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडिसिव्हर इंजेक्शन मिळत नाही. एप्रिल 2021 अखेरपर्यंत 45 वयोगटापुढील सर्वांना कोशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लस दिली जात होती. मात्र, लस पुरवठा अपुऱ्या असल्याने लस घेण्यासाठी दररोज भल्या पहाटे रांग लावूनही लस मिळत नव्हती. त्यातच एक मे 2021 पासून 18 वयोगटापुढील सर्वांना लस देण्याचे शासनाने ठरविले. मात्र, मागिल चार दिवसांपासून लसीकरण केंद्र बंद होती. लस घेण्यासाठी शासनाने नवीन संकेतस्थळ जाहीर केले, त्यावर तरुणांनी नोंदणी केली, त्यांना लस घेण्यासाठी केंद्र व वेळही कळविली. मात्र, लसीकरण केंद्रावर प्रचंड गोंधळ निर्माण झाला. लस उपलब्ध नाही, मागिल महिन्यात ज्यांनी नोंदणी केली, त्यांचे नाव नाही, नागरिकांची गर्दी असा अनागोंदी कारभार हडपसर (मगरपट्टा चौक) येथील खासदार स्व. अण्णासाहेब मगर रुग्णालयात दिसून आला. नियोजनाचा अभाव असल्याने तरुणाईसह ज्येष्ठ नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.

दरम्यान, मगर रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचारीसुद्धा गर्दीमुळे गोंधळून गेल्याने त्यांना काही सूचत नसल्याचे दिसून आले. सकाळी अकरा वाजेपर्यंत अवघ्या दोनजणांना लस देण्यात आल्याची माहिती डॉ. घनवट यांनी दिली.

हडपसर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. शंतनू जगदाळे म्हणाले की, शासनाने 11 ते 44 वयोगटातील सर्वांना लस देण्याचे नियोजन केले. शहरात फक्त दोन ठिकाणी होते, त्याची व्याप्ती वाढविली असून, हडपसरमधील अण्णासाहेब मगर रुग्णालयामध्ये लस देण्याचे काम सुरू केले. मात्र, त्याचे योग्य नियोजन केंद्र, राज्य वा महापालिका प्रशासनाकडून केले गेले नाही. लस घेण्यासाठी 28 एप्रिलपासून लसीकरण नोंदणी सुरू केली. मात्र, 4 मे 2021 पर्यंत ज्यांनी नोंदणी केली आहे, त्यातील कोणालाही ऑनलाइन अपॉइंटमेंट मिळाली नाही. मात्र, ज्यांनी काल रात्री आणि सकाळी नोंदणी केली, त्यांना लगेच स्थळ आणि वेळ कळविली गेली. त्यामुळे अनेक लाभार्थी मगर रुग्णालयासमोर रांगेमध्ये थांबले होते. त्यांना लस मिळत नसल्याने अनेकांना घरी जावे लागले. पुणे महानगरपालिकेच्या वतीने योग्य नियोजन करून सर्वांना लस दिली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.