सदोष पाणी कपातीचे वेळापत्रक पाहून पुणेकर धास्तावले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन  – पाण्याची उधळपट्टी करणारे, दिवसातून दोन वेळा अंघोळ करणारे अशी टीका सहन करणाऱ्या पुणेकरांना महापालिकेने जाहीर केलेले सदोष पाणी कपात वेळापत्रक पाहून टेन्शन आले आहे. पालिकेचे हे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक अत्यंत सदोष असून त्यात काही ठिकाणी फक्त अर्धा तास ते काही ठिकाणी सहा तास पाणी पुरवठा होणार असल्याचे दिसून येत आहे. नोकरी, व्यवसाय संभाळून रात्री अपरात्री तेही अगदी थोडा वेळ होणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या काळात पाणी कसे भरुन ठेवायचे याचीच चिंता पुणेकरांना आतापासून सतावू लागली आहे. हे सर्व पुढील ८ महिने सहन करावे लागणार असून आताच करंगळी ऐवढ्या धाराने पाणी येते यापुढे कसे होणार, याचीच चर्चा आज सकाळपासून शहरात सर्वत्र सुरु झाली आहे.

एरवी पाण्याची चंगळ असणाऱ्या पुणेकर अस्वस्थ झाले आहेत. येत्या सोमवारपासून पुणे महापालिका एकवेळ पाणी पुरवठा करणार आहे. शहराच्या अनेक भागात आताही केवळ एक वेळच पाणी पुरवठा होत आहे. असे असताना आता त्यातही कपात होणार असून सलग व जास्त दाबाने ५ तास पाणी पुरवठा होणार असल्याचे महापालिकेने मंगळवारी जाहीर केले. त्याचवेळी शहराच्या विविध भागात होणाऱ्या पाणीपुरवठ्याचे वेळापत्रकही जाहीर केले आहे.

या वेळापत्रकानुसार मेडिपाँईट येथे रात्री १२़:३० ते १ असा केवळ अर्धा तास पाणी पुरवठा होणार असल्याचे दिसून येत आहे. त्याचवेळी पानमळा परिसरात सायंकाळी ५ ते मध्यरात्री १२ असा सर्वाधिक ७ तास पाणीपुरवठा होणार आहे. सुतारवाडी येथे पहाटे ४ ते ६़:३० वाजेपर्यंत पाणीपुरवठा होणार आहे. बाणेरगाव पहाटे ४ ते ७, बोपोडी पहाटे ४ ते ८:३० पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे सुतारवाडी, बाणेर भागातील नागरिकांना भल्या पहाटे उठावे लागणार आहे. जर उशीर केला तर दिवसभर पाण्याविना राहण्याची वेळ येणार आहे.

महापालिकेने सर्वांना सलग ५ तास आणि तेही पूर्ण दाबाने पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याचे जाहीर केले असले तरी प्रत्यक्ष वेळापत्रकामध्ये काही मोजक्या भागांनाच पाच तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ पाणी पुरवठा होणार आहे. बहुतांश भागात ३ ते ४ तास पाणीपुरवठा होणार आहे. त्यात पाणी सोडणाऱ्या व्हॉल्वमनवर अवलंबून असल्याने त्याच्या मर्जीवरच पुणेकरांना आता पुढील ८ महिने काढावे लागणार आहेत.

पुण्यातील अनेक जण नोकरी, व्यवसायानिमित्त मुंबई तसेच आसपासच्या गावात दररोज सकाळी उठून जात असतात. पाणी पुरवठ्याच्या वेळापत्रकानुसार आता घरातील किमान एका जणाला पाणी येईल, त्यावेळी घरात थांबावे लागणार आहे. २०१५ मध्ये वर्षभर पुणेकरांनी एकवेळ आणि तोही काही तास पाणी पुरवठा अनुभवला होता. आता पुन्हा तीच वेळ पुणेकरांवर आली आहे.