मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांना ठार मारण्याची धमकी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. मुख्यमंत्र्यांना धमकी मिळाल्यानंतर पोलिस प्रशासन सक्रिय झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल केला असून मुख्यमंत्र्यांना धमकावणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मुख्यमंत्र्यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मोहालीतील फेज 11 पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही या वर्षाची म्हणजेच 2021 ची पहिली एफआयआर आहे.

माहितीनुसार, मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांना ठार मारण्याच्या धमकीचे पोस्टर सार्वजनिक मार्गदर्शक नकाशावर लावण्यात आले होते. यात कॅप्टनला मरणाऱ्याला 10 लाख डॉलर्सचे बक्षीस देण्यासंदर्भात लिहिले गेले होते. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध फेज-11 पोलीस ठाण्यात आयपीसीच्या कलम 504, 506, 120बी, 34 आणि पंजाब प्रतिबंधक मालमत्ता अध्यादेश कायद्याच्या कलम 3, 4 आणि 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना पकडण्यासाठी सायबर टीमचाही सपोर्ट घेण्यात येत आहे. पोलिस जवळपास बसविलेले सीसीटीव्ही देखील तपासत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांना सूचना मिळाली होती कि, मोहालीतील सेक्टर- 66/67 च्या लाईट पॉईंटवर सार्वजनिक मार्गदर्शक नकाशा बसविला आहे. या नकाशावर कुणीतरी कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा फोटो लावून त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली आहे. जेव्हा पोलिसांची टीम तेथे पोहोचली तेव्हा पाहिले की, कोणीतरी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या फोटोचे प्रिंट आउट काढून त्यावर लिहिले की, जो कोणी कॅप्टन अमरिंदर सिंह यांची हत्या करेल त्याला 10 लाख डॉलरचे बक्षीस देण्यात येईल. दरम्यान, या पोस्टरवर कोणताही मोबाइल नंबर लिहिलेला नव्हता, परंतु पोस्टरच्या खाली एक ई-मेल लिहिलेला आहे. पोलिसांनी हा मेल आयडी सायबर सेलला पाठविला असून मुख्यमंत्र्यांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी सहकार्य मागितले आहे.